मुंबई : जागतिक क्रमवारीतला ‘नंबर वन’ राफेल नदाल नंबर वनसारखाच खेळला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा पराभव हा अटळ ठरला. त्यानं पराभव टाळण्यासाठी तब्बल अडीच तास संघर्ष केला खरा, पण अखेर सरशी नदालचीच झाली. राफेल नदालनं केविन अँडरसनचा 6-3, 6-3, 6-4 असा धुव्वा उडवून अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा आपलं नाव कोरलं.
स्पॅनिश बुलनं आजवरच्या कारकीर्दीत पहिल्यांदा 2010 साली आणि मग 2013 साली अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. पण यंदा त्यानं तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन जिंकून, आपल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदांची संख्या 'स्वीट सिक्सटिन'वर नेली.
नदालच्या अमेरिकन ओपन विजेतेपदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं यंदाच्या मोसमातलं दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं. त्यानं आणि रॉजर फेडररनं मोसमातली दोन-दोन ग्रँड स्लॅम विजेतीपदं पटकावून व्यावसायिक टेनिसवरचं आपलं वर्चस्व अबाधित राखलं.
नदालनं फ्रेन्च ओपन आणि अमेरिकन ओपन जिंकली, तर फेडररनं विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपन. यंदाच्या मोसमातलं हे दुहेरी ग्रँड स्लॅम यश नदालला समाधानकारक वाटतं. कारण ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही त्यानं फायनलमध्ये धडक मारली होती. नदालचं विम्बल्डनमधलं आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं असलं तरी, त्यानं पराभव टाळण्यासाठी पाच सेट्स संघर्ष केला.
नदालच्या अमेरिकन ओपनमधल्या विजेतेपदानं त्याची आणि फेडररची सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतीपदांची शर्यत आता आणखी तीव्र झाली आहे. 36 वर्षांच्या फेडररच्या खजिन्यात आजवर 19 ग्रँड स्लॅम विजेतीपदं आहेत, तर 31 वर्षांच्या नदालच्या शोकेसमध्ये आता 16 ग्रँड स्लॅम विजेतीपदं झाली आहेत.
त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर नदाल म्हणतो की, सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतीपदांच्या शर्यतीत फेडररला गाठणं हे माझं मुख्य उद्दिष्ट नाहीय. फेडररशी स्पर्धा करण्याचा मी कधीच विचार केला नाही. मी माझ्या शैलीनं खेळतो. तो त्याच्या शैलीनं. त्याच्या आणि माझ्यामधला तीन ग्रँड स्लॅम विजेतीपदांचा फरक माझ्या दृष्टीनं फार मोठा नाही. पण आम्ही दोघं आणखी किती वर्ष खेळत राहतो, ही माझ्या दृष्टीनं उत्सुकता आहे.
राफेल नदाल म्हणतो, त्यानुसार तो आणि फेडरर आणखी किती वर्षे खेळत राहणार ही जशी त्याची उत्सुकता आहे, तशीच ती टेनिसविश्वाचीही उत्सुकता आहे. कारण या घडीला व्यावसायिक टेनिसचं भावविश्व हे नदाल आणि फेडरर या दोन आधारस्तंभावरच उभं आहे.
2003 सालच्या विम्बल्डनपासून आजच्या अमेरिकन ओपनपर्यंत, 58 पैकी मोजून 35 ग्रँड स्लॅम विजेतेपदं ही त्या दोघांनीच वाटून घेतली आहेत. नदाल आणि फेडररची ही मक्तेदारी आणि त्या दोघांमधली निकोप स्पर्धा व्यावसायिक टेनिसला अधिकाधिक समृद्ध करणार आहे.
सोळावं ग्रँड स्लॅम नदालचं
सिद्धेश कानसे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
11 Sep 2017 11:49 PM (IST)
स्पॅनिश बुलनं आजवरच्या कारकीर्दीत पहिल्यांदा 2010 साली आणि मग 2013 साली अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. पण यंदा त्यानं तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन जिंकून, आपल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदांची संख्या 'स्वीट सिक्सटिन'वर नेली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -