मुंबई : गेल्या दीड वर्षापासून 'झी मराठी' वाहिनीवर गाजणारी शिव-गौरीची 'काहे दिया परदेस' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. 27 सप्टेंबरपासून 'संभाजी' ही ऐतिहासिक मालिका 'काहे दिया...' ऐवजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता प्रक्षेपित होईल.


महाराष्ट्राची लेक गौरी आणि वाराणसीचा छोरा शिव यांची प्रेमकथा असलेल्या 'काहे दिया परदेस' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली होती. सायली संजीवने यात गौरीची, तर रिषी सक्सेनाने यामध्ये शिव ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांच्याशिवाय दिग्गज अभिनेते मोहन जोशी, शुभांगी गोखले या मालिकेत प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते.

गेल्या वर्षी झालेल्या प्रेक्षक पसंतीच्या 'झी मराठी पुरस्कारां'मध्ये काहे दिया परदेसने सर्वोत्कृष्ट मालिकेसह अनेक मुख्य पुरस्कार खिशात घातले होते. त्यामुळे या मालिकेचा सर्वत्र बोलबाला होता. 'काहे दिया..'च्या अखेरच्या भागाबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे.

आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, पेशवा बाजीराव, सम्राट अशोक, झाशीची राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान, महाराणा प्रताप यासारख्या अनेक महापुरुषांच्या गाथा हिंदी आणि मराठी भाषेत मालिका रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजे यांच्या जीवनावर आणि त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी 'संभाजी' ही नवी मालिका 24 सप्टेंबरपासून झी मराठीवर रसिकांच्या भेटीला येत आहे.

या मालिकेतून छत्रपती संभाजी राजे यांची शौर्यगाथा रसिकांना अनुभवता येणार आहे. अभिनेता अमोल कोल्हे या मालिकेत संभाजींची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी शंभूराजे नाटकात त्यांनी संभाजी राजेंची भूमिका साकारल्यामुळे या मालिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.

अभिनेता शंतनू मोघे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असून प्रख्यात अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहे. 24 सप्टेंबर रोजी संभाजी मालिकेचा दोन तासांचा पहिला भाग प्रक्षेपित होणार आहे.