अबूधाबी : बाळंतपणाच्या रजेनंतर कमबॅक करणारी टेनिसस्टार सेरेना विल्यम्सला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागत आहे. अबू धाबी एक्झिबिशन टूर्नामेंटमध्ये जेलेना ओस्तापेंकोकडून सेरेना पराभूत झाली.


फ्रेंच ओपनची विजेती 20 वर्षीय जेलेना ओस्तापेंकोने सेरेनाला 6-2, 3-6, 10-5 अशा सेट्समध्ये हरवलं.

अवघ्या चार महिन्यांपूर्वी म्हणजे सप्टेंबर महिन्यात सेरेनाने मुलीला जन्म दिला होता. आजचा सामना खेळताना 36 वर्षीय सेरेनाचा फिटनेस पूर्वीसारखा नसल्याचं अनेकांनी सांगितलं.

मला पुरुष म्हणून हिणवायचे, सेरेनाचं आईला भावनिक पत्र


'ब्रेकनंतर पहिली मॅच नेहमीच कठीण असते' असं सेरेना म्हणते. 'मी पुनरागमन करु शकले, याचाच आनंद आहे' अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

जानेवारीत होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनचं टायटल आपल्या नावावर ठेवण्यासाठी सेरेनाचे प्रयत्न असतील.

आणि बातमी फुटली...

गरोदरपणाची बातमी शक्य तितके महिने गुप्तच ठेवण्याचा आपला प्रयत्न होता. पण आपल्याच अनवधानानं बिकिनीतला तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाला आणि ती बातमी फुटली असं सेरेनानं सांगितलं होतं.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या दोनच दिवसआधी आपण गरोदर असल्याचं कळल्याची कबुलीही तिनं दिली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळायचं की, नाही याबाबत मी द्विधा मनस्थितीत होते, असंही सेरेना म्हणाली होती. माझं खेळणं बाळासाठी धोकादायक ठरु शकलं असतं, त्यामुळे मी वेगळ्या पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न केला. शक्य तितका ताण आणि थकवा टाळण्याचा प्रयत्न केल्याचंही सेरेनाने स्पष्ट केलं.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 'रेडिट' या वेबसाईटचा सहसंस्थापक अॅलेक्सिस ओहानियनसोबत सेरेनाचा साखरपुडा झाला होता.

जानेवारी महिन्यात सेरेनानं बहीण व्हीनस विल्यम्सला हरवून ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर ती टेनिसच्या कोर्टपासून दूर राहिली. सेरेनाने आतापर्यंत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदं पटकावण्याचा मान मिळवला आहे. सेरेनाने 23 वेळा ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावलं आहे.