पुलवामा हल्ला : 4 जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
एबीपी माझा वेब टीम | 31 Dec 2017 07:44 AM (IST)
अवंतिपुरा सेक्टरमधील लेथपोरा भागातील सीआरपीएफ कॅम्पवर हा हल्ला झाला.
श्रीनगर : जम्मू काश्मिरच्या पुलवामा भागात कमांडो ट्रेनिंग सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे चार जवान शहीद झाले असून काही जवान जखमी झाले आहेत. दोघा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं. सीआरपीएफचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी रात्री दोन वाजल्यापासून चकमक सुरु होती. अवंतिपुरा सेक्टरमधील लेथपोरा भागातील सीआरपीएफ कॅम्पवर फिदायीन हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले असून जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दहशतवादी ट्रेनिंग सेंटरमध्ये लपून बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच जम्मू काश्मिर पोलिस आणि सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.