मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या खांद्यावर बीसीसीआयनं टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी सोपवली आहे. सचिन, सौरव आणि लक्ष्मण या तिघांचा बीसीसीआयच्या त्रिसदस्यीय सल्लागार समितीत समावेश आहे.
या समितीला मुख्य समन्वयक म्हणून माजी सचिव संजय जगदाळे यांची जोड देऊन बीसीसीआयचं भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड भारतीय क्रिकेटच्या 'बिग थ्री'वर सोपवली आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी देशविदेशातून तब्बल 57 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बीसीसीआयच्या प्राथमिक निकषांनुसार त्यापैकी केवळ 21 अर्ज वैध ठरले आहेत.
प्रामुख्यानं या 21 जणांमधूनच टीम इंडियाच्या भावी मुख्य प्रशिक्षकांची निवड होईल. पण त्रिसदस्यीय समितीनं मागणी केल्यास त्यांना बाद झालेल्या उमेदवारांचे अर्जही दाखवण्यात येतील. दरम्यान, या समितीचा एक सदस्य सचिन तेंडुलकर सध्या देशाबाहेर आहे. पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बीसीसीआयनं निवडलेल्या या समितीला 22 जूनपर्यंत आपला अंतिम रिपोर्ट बीसीसीआय सचिव अजय शिर्केसमोर सादर करायचा आहे.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी संदीप पाटील, रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे यांच्यासह दिग्गजांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.