विशाखापट्टणम : भारत आणि न्यूझीलंड संघांमधील पाचव्या आणि अखेरच्या वन डे  सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे टीम इंडियाचे शिलेदार आज आपापल्या आईच्या नावाची जर्सी घालून मैदानात उतरले आहेत. फक्त क्रिकेटरच नाही तर समालोचकांही आईच्या नावाची जर्सी परिधान केली आहे.


विशाखापट्टणमच्या रणांगणात ही लढत होत आहे.

दरम्यान, या सामन्यातून गोलंदाज जयंत यादव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. टीम इंडियाचा माजी धडकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने त्याला वन डे कॅप परिधान केली.

धोनीच्या रांचीत खेळवण्यात आलेली चौथी वन डे जिंकून केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. त्यामुळे पाचवा सामना जिंकून मालिकेवर कब्जा मिळवण्याची संधी भारताकडे आहे.

धोनी, कोहली आणि रहाणेच्या जर्सीवर आईचं नाव


स्टार प्लसची 'नई सोच'

पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना प्राधान्य मिळालं पाहिजे, यासाठी टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूंनी पुढाकार घेतला आहे. स्टार प्लसने ‘नई सोच’ या अभियानाचे आयोजन केलं आहे. या अभियानाअंतर्गत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील स्टार क्रिकेटपटूंनी प्रचारासाठी आपल्या जर्सीवर स्वत:च्या किंवा वडिलांच्या नावाऐवजी आईच्या नावाचा वापर केला आहे. कंपनीने यासाठी बीसीसीआयसोबत विशेष करारही केला आहे.

टीम इंडियाचा एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, कसोटी कर्णधार विराट कोहली आणि फलंदाज अजिंक्य रहाणे यांची 'नई सोच'च्या जाहिरातीत आपल्या जर्सीवर आईच्या नावाची जर्सी परिधान केली होती.

भारतीय संघ : महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनिष पांडे, केदार जाधव, अक्षर पटेल, जयंत यादव, अमित मिश्रा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा

न्यूझीलंड संघ : मार्टिन गप्टिल, टॉम लॅथम, केन विल्यमसन, रॉस टेलर, जेम्स निशम, ब्रॅडली-जॉन बॉटलिंग, कोरी अँडरसन, मिशेल सँटनर, इश सोढी, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी

पाहा व्हिडीओ