माऊंट मॉन्गॅनुई :   विराट कोहलीच्या टीम इंडियानं दुसऱ्या वन डेत न्यूझीलंडचा 90 धावांनी धुव्वा उडवून, प्रजासत्ताक दिनाचा आनंद द्विगुणित केला. भारतीय संघानं या विजयासह पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडला विजयासाठी 325 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताच्या प्रभावी आक्रमणासमोर न्यूझीलंडचा अख्खा डाव 234 धावांत गडगडला.


कुलदीप यादवनं 45 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून, लागोपाठ दुसऱ्या सामन्यात आपल्या गोलंदाजीचा करिष्मा दाखवला. भुवनेश्वर कुमार आणि यजुवेंद्र चहलनं प्रत्येकी दोन विकेट्स काढून त्याला छान साथ दिली. मोहम्मद शमी आणि केदार जाधवनं प्रत्येकी एकेक विकेट घेतली.

तत्पुर्वी टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 325 धावांचे लक्ष्य ठेवले होते. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या अर्धशतकांनंतर महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, अंबाती रायुडू आणि केदार जाधवच्या फटकेबाजीच्या बळावर 324 धावा केल्या होत्या.  सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी अर्धशतकं ठोकली. पण त्यानंतर धवन 66 धावांवर बाद झाला. पाठोपाठ रोहित शर्मा 87 धावांवर बाद झाला.

यानंतर आलेल्या विराट कोहलीने 43 तर रायडूने 47 धावा केल्या. या दोघांचीही अर्धशतकं हुकली.  शेवटच्या काही षटकांत धोनी (48) आणि केदार जाधव (22) यांनी फटकेबाजी करत भारताची धावसंख्या तीनशेपार नेली होती. न्यूझीलंडकडून बोल्ट आणि फर्ग्युसनने प्रत्येकी 2 गडी बाद केले होते.

नेपियरच्या पहिल्या वन डेत निर्विवाद विजय मिळवत न्यूझीलंड दौऱ्यात शानदार सलामी दिली होती. नेपियरच्या मैदानात किवी फलंदाजांनी भारताच्या फिरकी आक्रमणासमोर सपशेल लोटांगण घातलं होतं.  या सामन्यातही टीम इंडियापुढे किवी फलंदाजांनी नांगी टाकली.