लंडन : टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात 11 धावांनी संघर्षपूर्ण विजय मिळवला आहे. अफगाणिस्तान संघाने दमदार कामगिरी करत शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत दिली. मात्र भारतीय गोलंदाजांनी आपल्या कामगिरीने हा विजय ओढून आणला. भारताचा विश्वचषकातील हा सलग चौथा विजय ठरला.


भारताने अफगाणिस्तान समोर 225 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नाबीने एकाकी झुंज दिली. नाबीने 55 चेंडूत 52 धावांची खेळी केली. एका क्षणी नाबीच्या खेळीमुळे भारत पराभूत होते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. अफगाणिस्तानकडून रहमत शाहने 36, गुलबदिन नैब 27, हाशमतुल्लाह शाहिदीने 21 धावा केल्या.


मोहम्मद शमीची हॅटट्रिक


टीम इंडियाच्या विजयात मोहम्मद शमीची हॅटट्रिक महत्त्वाची ठरली. मोहम्मद शमीनं अखेरच्या षटकातल्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर मोहम्मद नाबी, आफताब आमल आणि मुजीब रेहमानला बाद करत हॅटट्रिक साजरी केली.  सामन्यात मोहम्मद शमीने चार तर जसप्रीय बुमराह, युजवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्याने 2-2 विकेट घेतल्या.


त्याआधी अफगाणिस्तानच्या प्रभावी फिरकीसमोर टीम इंडियाला 50 षटकांत आठ बाद 224 धावांचीच मजल मारता आली. त्यामुळे अफगाणिस्तानसमोर विजयासाठी अवघं 225 धावांचंच लक्ष्य होतं. भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधवनं वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. पण अफगाणिस्तानच्या अचूक माऱ्यामुळे टीम इंडियाच्या इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं.


विराटनं 67 तर केदारनं 52 धावांची खेळी उभारली. अफगाणिस्तानच्या गुलबदीन नायब आणि मोहम्मद नबीनं प्रत्येकी दोन तर मुजीब उर रेहमान, आफताब आलम, रेहमत शाहनं आणि रशिद खाननं प्रत्येकी एक विकेट घेतली.