उस्मानाबाद : सिगारेटच्या पाकिटावर ज्याप्रमाणे सावधानतेचा इशारा छापला जातो, त्याच प्रमाणे साखरेच्या पाकिटांवरही लवकरच सावधानतेचा इशारा पाहायला मिळणार आहे. साखरेचे अतिसेवन शरिरास धोकादायक आहे, अशा आशयाचा इशारा पाकिटावर छापला जाईल. मधुमेहाची राजधानी बनत चाललेल्या भारताला, स्वीट पॉयझनपासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मध्यंतरी साखर, मीठ आणि मैदा या पदार्थांचे अतिसेवन टाळण्यासाठी राईट टू इट मिशन मोहीम सुरु करण्यात आली होती. आता सरकारनेदेखील त्याची दखल घेतली आहे. साखरेवर सावधानतेचा इशारा छापून लोकांना साखरेच्या अतिसेवनाच्या दुष्परीणामांची आठवण करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. येत्या काही महिन्यांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाईल.

भारतात प्रतिवर्षी मृत्यूमुखी पडणार्‍या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हृदयरोग आणि मधुमेहाचे रुग्ण असतात. याबाबतचे काही अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारने एका स्वयंसेवी संस्थेमार्फत 'राईट टू इट मिशन' राबवले. त्यामुळे देशातील मधुमेहींची संख्या समोर आली. परिणामी साखर पॅकिंगवर सावधानतेचा वैधानिक इशारा लिहिणे बंधनकारक करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.