नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. मात्र भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली आहे.  या विजयासोबतच टीम इंडियाने एका अशा विक्रमाची बरोबरी केली आहे, जो विक्रम 1932 सालापासून कसोटी खेळणाऱ्या भारतीय संघाला करता आलेला नव्हता.


या विजयासोबत कसोटी क्रिकेटमध्ये नेहमीच वर्चस्व ठेवणाऱ्या ऑस्ट्रेलियाची बरोबरी केली. भारताचा हा सलग नववा मालिका विजय आहे, जो भारतीय क्रिकेटसाठी एक मोठा विक्रम आहे. यापूर्वी सलग नऊ वेळा कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केवळ ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्त्वाखालील संघाने हा विक्रम रचला होता.

ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक नऊ वेळा कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम 2005 के 2008 या काळात केला.

भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्त्वात विजय रथावर आरुढ आहे. टीम इंडियाची ही विजयी मालिका श्रीलंकेपासून सुरु होऊन, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि आता पुन्हा श्रीलंकेपर्यंत आली आहे.

भारतीय संघानं ही कामगिरी बजावून सलग नऊ मालिकाविजयांच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाची बरोबरी केली. टीम इंडियानं २०१५ सालच्या सप्टेंबरपासून आजवर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. भारतानं २०१५ साली श्रीलंकेला श्रीलंकेत आणि दक्षिण आफ्रिकेला भारतात धूळ चारली होती. मग २०१६ साली टीम इंडियानं वेस्ट इंडिजला विंडीजमध्ये तर न्यूझीलंड आणि इंग्लंडला भारतात हरवण्याची किमया केली होती. यंदा बांगलादेशाला आणि ऑस्ट्रेलियाला भारतात, तर श्रीलंकेला आधी श्रीलंकेत आणि मग मायदेशात हरवून टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाची बरोबरी केली.