कोलकाता: कोलकाता कसोटीच्या पहिल्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या दमदार भागीदारीनं टीम इंडियाचा डाव सावरला. सुरुवातीला झटपट तीन गडी गमवल्यानंतर या दोघांनी सावध फलंदाजी करत भारताच्या डावाला आकार दिला.
ईडन गार्डन्सवरील या कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारताच्या खात्यात 7 बाद 239 धावा जमा झाल्या आहेत. या कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पण शिखर धवन, मुरली विजय आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतल्यानं भारताची अवस्था 3 बाद 46 अशी झाली होती.
चौथ्या विकेटसाठी पुजारा आणि रहाणेनं 141 धावांची भागीदारी रचून भारताचा डाव सावरला. पुजारानं 219 चेंडूंमध्ये 17 चौकारांसह 87 धावा केल्या. तर रहाणेनं 157 चेंडूंमध्ये 11 चौकारांसह 77 धावा केल्या.
अश्विन 26 धावा करून माघारी परतला, तर रोहित शर्माला अवघ्या दोनच धावा करता आल्या. अंधुक प्रकाशामुळं पहिल्या दिवसाचा खेळ काही षटकं आधीच थांबवण्यात आला, तेव्हा रिद्धिमान साहा 14 धावांवर आणि रविंद्र जाडेजा शून्यावर खेळत होता.