कानपूर : टीम इंडियाने कानपूर वन डेत न्यूझीलंडवर सहा धावांनी थरारक विजय मिळवला. भारताने या विजयासह तीन वन डे सामन्यांची मालिकाही 2-1 ने जिंकली. टीम इंडियाचा वन डे सामन्यांमधला हा सलग सातवा मालिका विजय ठरला.
कानपूर वन डेत भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 338 धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी त्या लक्ष्याचा आत्मविश्वासाने पाठलाग केला. पण जसप्रीत बुमरा आणि यजुवेंद्र चहलच्या प्रभावी माऱ्याने न्यूझीलंडला 50 षटकांत सात बाद 331 धावांत रोखलं.
भारताकडून जसप्रीत बुमराने 47 धावांत 3, तर यजुवेंद्र चहलने 47 धावांत दोन फलंदाजांना माघारी धाडलं. दरम्यान संपूर्ण मालिकेत शानदार फॉर्मात असणारा भुवनेश्वर कुमार या सामन्यात जरा महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकात एक विकेट घेत 92 धावा दिल्या.
विराट-रोहितची विक्रमी भागीदारी
विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या कर्णधार आणि उपकर्णधाराच्या जोडीने कानपूर वन डेत न्यूझीलंडसमोर विजयासाठी 338 धावांचं आव्हान उभं केलं..
विराट आणि रोहितने वैयक्तिक शतकं झळकावून दुसऱ्या विकेटसाठी 230 धावांची भागीदारीही रचली. त्यामुळेच या वन डेत टीम इंडियाने 50 षटकांत सहा बाद 337 धावांची मजल मारली. वन डे क्रिकेटमध्ये चार वेळा 200 पेक्षा जास्त धावांची भागीदारी रचणारी ही पहिलीच जोडी ठरली आहे.
रोहितने 138 चेंडूंत 18 चौकार आणि दोन षटकारांसह 147 धावांची खेळी उभारली. त्याचं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं हे पंधरावं शतक ठरलं.
विराट कोहलीने 106 चेंडूंमधली 113 धावांची खेळी नऊ चौकार आणि एका षटकारानं सजवली. विराटचं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं हे 32 वं शतक ठरलं. त्याने वन डे सामन्यांमधल्या नऊ हजार धावांचा टप्पाही आज ओलांडला.
थरारक सामन्यात भारताचा विजय, न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Oct 2017 06:24 PM (IST)
भारताने या विजयासह तीन वन डे सामन्यांची मालिकाही 2-1 ने जिंकली. टीम इंडियाचा वन डे सामन्यांमधला हा सलग सातवा मालिका विजय ठरला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -