लंडन : विराट कोहलीची टीम इंडिया आयर्लंड जिंकून इंग्लंडच्या दीर्घ दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडियासमोरचं पहिलं आव्हान हे ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्याचं आहे. भारत आणि इंग्लंड संघांमधला हा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना आज मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवण्यात येईल.


भारतीय संघाने आयर्लंड दौऱ्यातल्या दोन्ही ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. पण आयर्लंड आणि इंग्लंड या दोन संघांच्या ताकदीत जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यात ऑस्ट्रेलियाच्या पाच वन डे आणि एका ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात झालेल्या पराभवानं इंग्लंड संघाचं मनोधैर्य आणखी उंचावलं आहे. त्यामुळं इंग्लंड दौऱ्यातली तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका भारताच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरणार आहे.

भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री दहा वाजता सुरु होणार आहे.

बुमरा आणि वॉशिंगटन सुंदरच्या जागी दोन नवख्या खेळाडूंना संधी

जसप्रीत बुमराहच्या जागी नवख्या दीपक चहरला तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अष्टपैलू कृणाला पंड्याचा टी-ट्वेण्टी संघात समावेश करण्यात आला आहे. वॉशिंग्टन सुंदरचा इंग्लंडविरुद्धच्या वनडे संघातही समावेश असल्याने वनडे संघात त्याच्या जागी फिरकीपटू अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे.

इंग्लंडविरुद्ध सुरु होत असलेल्या टी-ट्वेण्टी मालिकेआधी बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर जमखी झाल्याने भारतीय संघाला धक्का बसला. आता या दोघांच्या जागी दोन युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.

वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि धडाकेबाज अष्टपैलू कृणाल पंड्याने आयपीएल आणि इंग्लंडमध्ये ‘इंडिया ए’ संघाकडून खेळताना दमदार कामगिरी केली होती. या जोरावरच त्यांना भारताकडून खेळण्याची संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेण्टी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना बुमराहला हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. तर सरावादरम्यान फुटबॉल खेळताना वॉशिंग्टन जखमी झाला होता.

इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची तीन सामन्यांची टी-ट्वेण्टी मालिका 3 जुलैला तर वनडे मालिका 12 जुलैला सुरु होणार आहे.