Ravi Bishnoi : T20 क्रिकेटला जागतिक क्रमवारीत एक नवा गोलंदाज मिळाला आहे. भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आता ICC T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत गोलंदाजीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. रवि बिश्नोईने गेल्या अनेक  महिन्यांपासून प्रथम स्थानावर विराजमान असलेल्या राशिद खानला बाजूला करत ही कामगिरी केली आहे.






गोलंदाजांच्या क्रमवारीत फिरकीपटू टाॅप 5 स्थानांवर 


रवी बिश्नोईच्या खात्यात आता 699 गुण आहेत. तो राशिद खान (692) पेक्षा 7 रेटिंग गुणांनी पुढे गेला आहे. या यादीत श्रीलंकेचा वानिधू हसरंगा (679) तिसऱ्या क्रमांकावर, आदिल रशीद (679) चौथ्या क्रमांकावर आणि महिश तिक्षणा (677) पाचव्या स्थानावर आहे. म्हणजेच T20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या क्रमवारीत फिरकीपटू अव्वल पाच नंबरवर स्थानांवर आहेत.






ऑस्ट्रेलिया मालिकेचा फायदा रवी बिश्नोईला मिळाला


ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेचा रवी बिश्नोईला खूप फायदा झाला. मालिकेत बिश्नोईने शानदार गोलंदाजी करत 5 सामन्यात 9 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे या मालिकेत धावांचा पाऊस पडत असतानाही तो नियमितपणे विकेट घेण्यात यशस्वी ठरला. या कामगिरीसाठी त्याची 'प्लेअर ऑफ द सिरीज' म्हणूनही निवड झाली.






गोलंदाजीची सरासरी 17 आणि स्ट्राईक रेट 14


रवी बिश्नोईने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या फिरकीपटूने फेब्रुवारी 2022 मध्ये ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पहिल्याच सामन्यात तो 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला. त्याने 17 धावा देऊन दोन बळी घेतले. तेव्हापासून आजतागायत हा गोलंदाज टी-20 मध्ये सातत्याने सर्वोत्तम कामगिरी करत आहे. बिश्नोईने आतापर्यंत 21 सामने खेळले असून 17.38 च्या गोलंदाजीची सरासरी आणि 7.14 च्या इकॉनॉमी रेटने एकूण 34 बळी घेतले आहेत. त्याचा गोलंदाजीचा स्ट्राईक रेट 14.5 आहे. म्हणजेच त्याने प्रत्येक 15व्या चेंडूवर एक विकेट घेतली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या