लंडन : भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी यजमान इंग्लंडवर 35 धावांनी विजय मिळवत, आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2017 च्या मोहीमेची शानदार सुरुवात केली.

या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार मिताली राजने 71 धावांची दमदार खेळीसह 7 सामन्यांमध्ये अर्धशतकापेक्षा जास्त धावा विश्वविक्रम केला. या सामन्यादरम्यान मिताली राज तिच्या बॅटिंगआधी पुस्तक वाचताना दिसली. मितालीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिताली राजने अर्धशतकांच्या बाबतीत विराटलाही मागे टाकलं!

यावर स्वत: मिताली राजने प्रतिक्रिया देताना खुलासा केला आहे की, अखेर बॅटिंगआधी ती पुस्तक का वाचत होती. मितालीने सांगितलं की, "मी आमच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांकडून वाचण्यासाठी काही पुस्तकं घेत असते. त्यांनी मला रुमी यांचं एक पुस्तक वाचण्यासाठी दिलं होतं, जे मी बॅटिंगआधी वाचत होते. मिताली म्हणाली की, निवांत बसून पुस्तक वाचण्यासाठी ते चांगलं वातावरण होतं. यामुळे बॅटिंगआधी स्वत:ला शांत ठेवण्यासाठी मदत होते."

https://twitter.com/ICC/status/878719119205519360

बॅटिंगआधी पुस्तक वाचून स्वत:ला शांत आणि फ्रेश ठेवण्याचा मितालीचा अंदाज अनेकांना आवडला. यानंतर आयसीसीनेही ट्वीट केलं की, "मिताली राजपेक्षा शांत दुसरी कोणीही नाही."

https://twitter.com/ICC/status/878589776114446337

इंग्लंडविरुद्ध मिताली राजने 71 धावांची खेळी रचत नवा विश्वविक्रम आपल्या नावावर जमा केला. शानदार फॉर्ममध्ये असलेली मिताली, महिला वन डे क्रिकेटच्या इतिहासात सलग सात अर्धशतक ठोकणारी पहिली महिला फलंदाज बनली आहे.

मिताली राजने सलग 7 वन डे  डावांमध्ये 70*, 64, 73*, 51*, 54, 62* आणि 71 धावांची खेळी रचत, महिला क्रिकेटमध्ये 7 वेळा 50 पेक्षा जास्त धावसंख्येचा विक्रम रचला. मितालीच्या आधी ऑस्ट्रेलियाची लिंडसे रीलर, इंग्लंडची शार्ले एडवर्ड आणि ऑस्ट्रेलियाची अॅलिस पेरीने वन डे क्रिकेटच्या सलग सहा डावांमध्ये अर्धशतक केलं होतं.