पोर्ट ऑफ स्पेन: टीम इंडियानं दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजवर 105 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला. त्यामुळे सामन्यातील 7 षटकं कमी करण्यात आली. 43 षटकांच्या सामन्यात सलामीवीर अजिंक्य रहाणेच्या दमदार शतकाच्या जोरावर भारतानं 310 धावांचा डोंगर रचला.

वेस्टइंडिजनं 43 षटकात 6 गडी गमावून फक्त 205 धावा केल्या. त्यामुळे भारतानं इंडिजवर तब्बल 105 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, वेस्ट इंडिजकडून होपनं झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण त्याची ही झुंज अपयशी ठरली. त्यानं 88 चेंडूत 81 धावा केल्या.

या विजयासह भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0नं आघाडी घेतली आहे. पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता.

311 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. भुवनेश्वरनं सुरुवातीलाच दोन गडी बाद करुन वेस्ट इंडिजला बॅकफूटवर ढकललं. तर आपला पहिलाच वनडे सामना खेळणाऱ्या कुलदीप यादवनं यावेळी तीन महत्वपूर्ण फलंदाजांना बाद केलं. तर आर. अश्विननंही एक बळी घेत विजयात मोलाची भूमिका बजावली.

सुरुवातीला वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीला पाचारण केलं. पण भारताकडून अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी चांगली सुरुवात करत तब्बल 114 धावांची भागीदारी रचली. यावेळी अजिंक्यनं खणखणीत (103 धावा) शतकही झळकावलं. तर शिखर धवननं 63 धावा केल्या आणि कर्णधार विराट कोहलीनं फक्त 66 चेंडूत 87 धावा फटकावल्या.

दरम्यान, मागील सामन्याप्रमाणेच या सामन्यातही युवराज सिंह अपयशी ठरला. तो फक्त 14 धावाच करु शकला. या सामन्यात शतक झळकावणारा अजिंक्य रहाणे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला.