Hockey Team India : हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेत (Hockey World Cup 2023) यंदाचं यजमानपद भारताकडे असूनही भारतीय संघ क्वॉर्टर फायनलमध्येही पोहोचू शकला नाही. भारतात या वर्षी हॉकी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. ओडिशामध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकात टीम इंडिया संयुक्तपणे नवव्या क्रमांकावर राहिली. दरम्यान या खराब कामगिरीनंतर आता टीम इंडिया एक नवी सुरुवात करत असून हॉकी प्रो लीग खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या स्पर्धेचं वेळापत्रकही समोर आलं आहे. 

हॉकी इंडिया या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघासोबत भारत या स्पर्धेत सहभागी होत असून 10 ते 15 मार्च दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यातील सलामीचा सामना आज म्हणजेच शुक्रवारी (10 मार्च) वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीविरुद्ध असणार आहे. याच वर्षात आशियाई स्पर्धाही होणार असून त्यापूर्वी भारतीय हॉकी संघाचा हा एकप्रकारचा सराव असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर पुढील वर्षी 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक 2024 होणार असून त्यासाठी भारत सज्ज होत आहे. संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह यावेळी बोलताना म्हणाला, 'ही एक चांगली गोष्ट आहे की आम्हाला वर्ल्ड चॅम्पियन जर्मनी आणि बलाढ्य ऑस्ट्रेलियासारख्या संघासोबत ही स्पर्धा खेळायला मिळत आहे. आम्ही आशियाई गेम्सच्या दृष्टीने या स्पर्धेतही कामगिरी करणार आहोत. तसंच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवण्यासाठीही ही स्पर्धा महत्त्वाची असेल.'

कसं आहे हॉकी प्रो लीगचं वेळापत्रक?

सामना संघ दिनांक वेळ
1 भारत विरुद्ध जर्मनी 10 मार्च सायंकाळी 7 वाजता
2 ऑस्ट्रेलिया विरुद्ध जर्मनी 11 मार्च सायंकाळी 7 वाजता
3 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 12 मार्च सायंकाळी 7 वाजता
4 भारत विरुद्ध जर्मनी 13 मार्च सायंकाळी 7 वाजता
5 जर्मनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया   14 मार्च सायंकाळी 7 वाजता
6 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 15 मार्च सायंकाळी 7 वाजता

जर्मनीने जिंकला वर्ल्डकप

यंदा भारतात विश्वचषक असूनही भारत खास कामगिरी करु शकला नाही. हॉकी वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडिया नवव्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचा समावेश डी पूलमध्ये करण्यात आला होता. यामध्ये त्याने 3 सामने खेळले. यादरम्यान 2 सामने जिंकले. एका सामन्यात पराभवाचा सामना करताना. या गटात इंग्लंड अव्वल स्थानी आहे. इंग्लंडने 3 पैकी 2 सामने जिंकले. पण त्यांची एकूण गोल जास्त होती. जर स्पर्धेच्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर तो जर्मनी आणि बेल्जियम यांच्यात खेळला गेला. पूर्ण वेळेपर्यंत सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. पण जर्मनीने पेनल्टी शूटआऊट जिंकल्यानंतर सामनाही जिंकला. तर दुसरीकडे नवव्या स्थानासाठी टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेशी लढत होती. भारताने त्यांचा 5-2 असा पराभव करत नववं स्थान मिळवलं.

हे देखील वाचा-