बंगळुरू : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला दुसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना आज सायंकाळी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. विशाखापट्ट्णमच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियानं तीन विकेट्सनं सनसनाटी विजय साजरा केला होता. त्यामुळं दोन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी, टीम इंडियाला करो या मरोच्या निर्धारानं दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात उतरावं लागेल.


भारतीय फलंदाजांनी विशाखापट्टणमच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना केवळ 126 धावांचंच संरक्षण दिलं होतं. त्या परिस्थितीतही जसप्रीत बुमरा आणि त्याच्या सहकारी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी संघर्ष करायला लावला होता. आता बंगळुरूच्या मैदानात टीम इंडिया विजयाच्या निर्धारानं उतरेल. 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशा केली. ऑस्ट्रेलियाने 127 धावांचे आव्हान त्यांनी शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी भारताला दुसरा सामना जिंकणे हे आवश्यक आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात खेळतानाही टीम इंडियाची नजर ही विश्वचषकाच्या पूर्वतयारीवर राहिल. भारतानं विशाखापट्टणमच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात धोनी, रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक या तिन्ही यष्टिरक्षकांना एकत्र खेळवलं होतं. भारताचा मुख्य यष्टिरक्षक म्हणून धोनीची निवड निश्चित मानली जात आहे. पण एक फलंदाज म्हणून धोनीला पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात धावगती उंचावता आली नव्हती. दिनेश कार्तिकला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे सामन्यांसाठी संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळं धोनी आणि रिषभ पंत यांच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीमधल्या कामगिरीवर निवड समिती आणि जाणकारांची नजर राहिल.