मुंबई : भारतीय जवानांच्या पराक्रमाने सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यातच प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी आणखी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. शहीद मेजर प्रसाद महाडिक यांची पत्नी गौरी महाडिक चेन्नईला ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेण्यास जाणार आहेत.

डिसेंबर 2017 मध्ये भारत-चीन सीमेवर तैनात असताना शहीद झाले होते. मात्र त्यांचं अधुरं राहिलेलं स्वप्नं गौरी महाडिक पूर्ण करणार आहेत. गौरी महाडिक यांनी वयाच्या 31 व्या वर्षी सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला. कंपनी सेक्रेटरी असलेल्या गौरी यांनी सेटल करिअर सोडून नव्या क्षेत्रात उडी घेण्याचा ध्यास त्यांनी घेतला.

लेखी परीक्षा पास झाले, आता रोज 5-10 किलोमीटर पळून ट्रेनिंगची तयारी करत आहे, असं गौरी महाडिक यांनी सांगितलं. 1 एप्रिल पासून चेन्नईच्या ओटीएमध्ये 49 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण सुरु होणार आहे.

VIDEO | गौरी महाडिक यांच्याशी बातचित



एकदा प्रसाद घरी आल्यानंतर गंमत म्हणून त्याची कॅप डोक्यावर घातली, तेव्हा मला तो ओरडला होता. आता मात्र, खरोखरीच लेफ्टनंटपदाची कॅप घालून दाखवते की नाही बघा, अशी गोड आठवणही त्यांनी सांगितली.

मंगळसूत्र, टिकली, बांगड्या आवर्जून घालते. प्रसाद माझ्यासोबतच आहे. मी चेन्नईत ट्रेनिंग घ्यायला जाईन तेव्हाही तो सोबतच असेल, अशा भावना गौरी महाडिकांनी व्यक्त केल्या.