बंगळुरु : बंगळुरुच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारतानं इंग्लंडला विजयासाठी 203 धावांचं आव्हान दिलं आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतानं 20 षटकांत 6 बाद 202 धावांचा डोंगर उभा केला.

'एम एस धोनी'  चित्रपटातील डायलॉग 'माही मार रहा है'ला साजेशी फटकेबाजी धोनीने केली. सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंगच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारताला 202 धावांची मजल मारता आली. रैनानं 63 धावांची, धोनीनं 56 धावांची तर युवराजनं 27 धावांची खेळी केली.

लोकेश राहुलनंही 22 धावा फटकावल्या. तर हार्दिक पांड्या 11 धावांवर बाद झाला. कर्णधार विराट कोहली मात्र चारच धावांवर धावचीत झाला होता. पदार्पणातच ऋषभ पंतने नाबाद 6 धावा केल्या.



बंगळुरुतील तिसऱ्या टी-20 सामन्यातून दिल्लीचा खेळाडू रिषभ पंतला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. मनीष पांडेला विश्रांती देऊन त्याला संधी देण्यात आली आहे.

टीम इंडिया आणि इंग्लंड हे दोन्ही संघ बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन्हीही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे हा सामना निर्णायक होणार आहे.

कसोटी आणि वन डे मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर इंग्लंड आज टी-20 मालिका जिंकण्यासाठी उत्सुक असेल. त्यामुळे इग्लंडला रोखणं भारतासमोर मोठं आव्हान असणार आहे.

यापूर्वी दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला होता. तर पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताला पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकणार, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

वयाचा फरक पडत नाही, लयीत येण्यासाठी मला एक मॅचही पुरेशी: नेहरा


नेहराचा बुमराला सल्ला अन् टीम इंडिया विजयी!


नेहराला माहित होतं, पण बुमरा प्रत्येकवेळी... : कोहली


बुमराचे शेवटचे सहा बॉल, ज्यामुळे हिरो बनला!


टी-20 मालिका : भारताचा इंग्लंडवर सनसनाटी विजय, बुमरा विजयाचा शिल्पकार