हैदराबाद : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे सामन्यांच्या मालिकेनिमित्तानं टीम इंडियाच्या शिलेदारांना नवी जर्सी मिळाली आहे. भारतीय संघाच्या या नव्या निळ्या जर्सीचं हैदराबादमध्ये अनावरण करण्यात आलं. विराट कोहली आणि त्याचे सहकारी तीच जर्सी परिधान करून हैदराबादच्या मैदानात उतरले होते. या जर्सीवर पहिला विजयदेखील टीम इंडियाने साकार केला.

इंग्लंडमधल्या आगामी विश्वचषकातही टीम इंडिया नव्या जर्सीत खेळणार आहे. या जर्सीवर तीन स्टार दाखवण्यात आले आहेत.


भारताच्या 1983 आणि 2011 सालच्या वन डे विश्वचषक आणि 2007 सालच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक विजयाचं हे स्टार प्रतीकं आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीनं या जर्सीचं अनावरण केलं. यावेळी अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ आणि भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज उपस्थित होते.

मागील विश्वचषकाप्रमाणेच यावेळीही भारतीय संघ विश्वचषकात नवीन जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. NIKE कंपनी याची मुख्य प्रायोजक असून हैद्राबादमध्ये हा कार्यक्रम पार पडला.



ही जर्सी निळ्या रंगाच्या दोन छटांमध्ये आहे. तर नारंगी रंगाचाही वापर या जर्सीमध्ये करण्यात आला आहे. तसेच मागील जर्सीप्रमाणेच ही नवीन जर्सीही पुनर्नवीनीकरण पॉलिस्टरपासून(रिसायकल पॉलिस्टर) तयार करण्यात आली आहे.