श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून विश्रांती घेतल्यानंतर पंड्याचा पर्यायी अष्टपैलू खेळाडू म्हणून भारताला एक चांगला पर्याय मिळाला आहे. कर्णधार विराट कोहलीच्या मते, हा खेळाडू परदेश दौऱ्यावर भारताच्या कामी येणार असून पंड्याचा पर्यायी खेळाडू म्हणून याची निवड करण्यात आली आहे. विजय शंकर असं या अष्टपैलू खेळाडूचं नाव आहे.
तामिळनाडूचा अष्टपैलू विजय शंकरचं भारताकडून खेळण्याचं फार काळाचं स्वप्न आहे. पण श्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात आपला समावेश होईल, याची त्याला अपेक्षा नव्हती. त्यामुळे या कसोटीसाठी भारतीय संघात झालेल्या निवडीचा विजय शंकरला आनंद होणं स्वाभाविक आहे.
टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पंड्याचा पर्याय म्हणून विजय शंकरकडे पाहिलं जातं. पण भुवनेश्वर कुमारला त्याच्या लग्नासाठी विश्रांती देण्यात आल्याने, आगामी दोन कसोटी सामन्यांसाठी विजय शंकरचा भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.
विजय शंकरला आता दक्षिण आफ्रिकेच्या आगामी दौऱ्यासाठीही निवडलं जाऊ शकतं, याचे विराट कोहलीनेही संकेत दिले आहेत. शंकरने चांगलं प्रदर्शन केल्यामुळे त्याची निवड करण्यात आली. हार्दिक पंड्या हा पहिली पसंत आहे. मात्र बॅकअप खेळाडूही ठेवावे लागतील, जे परदेश दौऱ्यावर कामी येतील, असं विराट म्हणाला.