मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या उर्वरित तीन वन डे सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या दोन वन डे सामन्यातील खराब गोलंदाजी पाहता भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांना परत बोलवण्यात आलं आहे. मोहम्मद शमीला उर्वरित सामन्यांसाठी वगळण्याचा निर्णय निवड समितीने घेतलाय. टीम इंडियाने विशाखापट्टणम वन डेत विंडीजला विजयासाठी तब्बल 322 धावांचं आव्हान दिलं. पण भारतीय गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे कर्णधार विराटच्या शतकाला विजयाचं सुख लाभलं नाही. शाय होपने अखेरच्या चेंडूवर ठोकलेल्या चौकाराने वेस्ट इंडिजला वन डे टाय करून दिली. या सामन्यात विंडीजला अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी सात धावांची आवश्यकता होती. बीसीसीआयच्या निवड समितीने पाच सामन्यांच्या या वन डे मालिकेसाठी सुरुवातीला केवळ दोन सामन्यांसाठी 14 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. यावेळी उर्वरित तीन वन डे सामन्यांसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा करत दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित वन डे सामन्यांसाठी भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा (उपकर्णधार), अंबाती रायुडू, रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, खलील अहमद, भुवनेश्वर कुमार, लोकेश राहुल, मनीष पांडे भारत वि. वेस्ट इंडिज वन डे मालिका पहिला वन डे – 21 ऑक्टोबर, गुवाहटी दुसरा वन डे – 24 ऑक्टोबर, विशाखापट्टणम तिसरा वन डे – 27 ऑक्टोबर, पुणे चौथा वन डे – 29 ऑक्टोबर, मुंबई पाचवा वन डे – 1 नोव्हेंबर, तिरुवअनंतपुरम विंडीजविरुद्ध पाच सामन्यांची वन डे मालिका झाल्यानंतर 4 ते 11 नोव्हेंबरदरम्यान तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येईल. विंडिजविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल, जिथे 21 नोव्हेंबरपासून टी-20 मालिका, त्यानंतर कसोटी मालिका आणि नंतर वन डे मालिका होईल. 18 जानेवारी 2019 पर्यंत भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असेल, त्यानंतर लगेच 23 जानेवारीपासून न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात होईल.