मुंबई : शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमादरम्यान झालेल्या अपघातावरुन आता शिवसेना-भाजपात राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. पायाभरणी कार्यक्रमाच्या दरम्यान सरकार कुठं होतं? असा सवाल आता शिवसेनेच्या वतीनं विचारण्यात आला आहे. कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत ढिसाळ असल्याची टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. या कार्यक्रमाची इतकी घाई करायला नको होती असंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. तर इतक्या लोकांचे प्राण संकटात टाकणाऱ्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत, असं शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


या शिवस्मारक पायाभरणीचा कार्यक्रमा दरम्यान सरकार नेमकं कुठे होतं ? हा सर्वात मोठा प्रश्न आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे. ज्यांनी नियोजन केलं त्यांनी अत्यंत ढिसाळ होतं. तिथे जाण्यासाठी जी बोट निवडली ती फायबर होती. त्यात 24 लोक होते, आणि केवळ 5-6 लाइफ जॅकेट होते. मग सुरक्षा व्यवस्था कुठे होती ? कशासाठी आपण हे करतोय? ह्यात सुद्धा राजकारण आहे का ? क्रेडिट साठी आपण हे करतोय का? असा सवाल सावंत यांनी केला आहे.

वल्लभभाई पटेल यांचा पुतळा करणारेच हा शिवस्मारकाचा पुतळा करणार आहेत. त्याचं शेवटचं फिनिशिंगचं काम सुरु असताना येथे ते अजून इथं आलेले नसताना या कार्यक्रमाला इतकी घाई का केली, असेही सावंत यांनी म्हटलं आहे. सरकारने याची जिम्मेदारी घेऊन या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

मुंबईजवळ अरबी समुद्रात आयोजित शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाच्या वेळी स्पीडबोट खडकावर आपटून बुडाल्यामुळे सिद्धेश पवार या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी भरलेली स्पीडबोट समुद्रात निघाली होती. शिवसंग्रामचा कार्यकर्ता असलेल्या मामासोबत सिद्धेश बोटीने निघाला होता. त्यावेळी बोट दीपस्तंभाच्या खडकावर आदळून अपघात झाला. सिद्धेश हा त्याचे सख्खे मामा आणि शिवसंग्रामचे कार्यकर्ते विक्रांत आंब्रे यांच्यासोबत शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी गेला होता. बोट अपघातात विक्रांत आंब्रेही जखमी झाले आहेत. सिद्धेश हा व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट होता. तो गेलं वर्षभर सीएची प्रॅक्टिस करत होता. मुख्यमंत्र्यांकडून मयत सिद्धेश पवारच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघातानंतर शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला.