मुंबई : भारतीय संघाचे बहुतांश खेळाडू सध्या आयपीएल खेळण्यात व्यस्त असताना भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आहे. आयसीसीच्या क्रमवारीत टीम इंडियाची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.

 
भारतीय संघ यापूर्वी तिसऱ्या स्थानावर होता. मात्र दक्षिण अफ्रिकेने तिसऱ्या स्थानी झेप घेतल्यामुळे भारताची एका स्थानाने पिछेहाट झाली. आयसीसीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने पहिलं स्थान कायम राखलं आहे, तर न्यूझीलंडने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

 
विश्वचषकात मिळालेल्या उपविजेतेपदामुळे न्यूझीलंडने 113 गुणांची कमाई केली. तर वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंडपेक्षा 11 गुणांची आघाडी घेत पहिल्या स्थानावर आपली मोहोर उमटवली आहे.

 
दक्षिण अफ्रिकेने भारतापेक्षा तीन गुण जास्त मिळवत 112 गुण कमावले, त्यामुळे भारताला 109 गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

 

टी 20 क्रमवारीत न्यूझीलंड अव्वल :

 

टी-20 क्रमवारीमध्ये न्यूझीलंडने यावेळी तिसऱ्या स्थानावरुन झेप घेत पहिले स्थान पटकावले आहे, तर भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. टी-20 विश्वचषक विजेता संघ वेस्ट इंडीजची मात्र एका स्थानाने घसरुन तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.

 
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी बजावल्यानंतर भारत टी-20 मध्ये अव्वल स्थानी गेला होता. तसेच कसोटीमध्येही दुसऱ्या स्थानी झेप घेतली होती. पण आता आयसीसीच्या नवीन क्रमवारीमुळे भारतीय क्रीडाप्रेमींची निराशा झाली आहे.