चेन्नई : टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत एका ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर आहे. चेन्नईतील अखेरची आणि पाचवी कसोटी भारताने जिंकल्यास ऐतिहासिक विजयाला गवसणी घालण्याची संधी विराट ब्रिगेडकडे आहे.
भारताने मुंबईची चौथी कसोटी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता चेन्नईत खेळवली जाणारी पाचवी आणि अखेरची कसोटी जिंकून इंग्लंडवर 4-0 असा विजय साजरा करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे.
कसोटी क्रिकेटच्या 84 वर्षांच्या इतिहासात भारताने आजवर इंग्लंडला 4-0 इतक्या मोठ्या फरकाने कधीच हरवलेलं नाही. 1932 सालापासून भारतीय संघ आजवर 151 कसोटी मालिकांमध्ये खेळला आहे. पण त्यात भारताला केवळ एकदाच 4-0 असा विजय साजरा करता आला आहे.
भारताने 2013 साली ऑस्ट्रेलियाला 4-0 असं हरवलं होतं. आता विराटची टीम इंग्लंडला 4-0 अशा फरकाने हरवणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरलं आहे.