नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नोटबंदीवरुन गोंधळ अजूनही सुरुच आहे. विरोधकांच्या गोंधळानंतर आज लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही नोटाबंदीच्या मुद्द्यावरील चर्चेवरुन गोंधळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.
संसद अधिवेशनाचं सूप वाजायला अवघे दोन दिवस शिल्लक आहे. पण, नोटबंदीच्या या गदारोळामुळं अनेक महत्वाची विधेयकं रखडली आहेत. जीएसटीसारखं महत्वाचं विधेयक देखील या वादात बाजुला पडलं आहे. पण, असं असताना देखील नोटबंदीच्या मुद्द्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज ठप्प झालं आहे.
आज सकाळी संसदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच वादविवाद झाले. नोटाबंदीच्या मुद्द्यावरील गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 12 पर्यंत तहकूब करण्यात आलं. पण त्यानंतरही गोंधळ तसाच सुरु राहिल्याने लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभर तहकूब करत असल्याची घोषणा केली.
दुसरीकडे राज्यसभेतही नोटाबंदीच्या मुद्द्यावरील चर्चेवरुन गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 पर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. पण नंतरही गोंधळ तसाच कायम राहिल्याने राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करावं लागलं
दरम्यान, या गोंधळावरुन भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त करताना, आपल्याला राजीनामा द्यावा वाटत असल्याची भावना व्यक्त केली आहे.