नवी दिल्ली : कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे नव्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. नाताळ अर्थात 25 डिसेंबरपासून 14 एप्रिलपर्यंत ही योजना लागू असेल. ग्राहकांना एक कोटी रुपये जिंकण्याची संधी आहे.


निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी यांसदर्भात ट्विटरवर घोषणा केली. या योजनेअंतर्गत 340 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भाग्यशाली 15 हजार ग्राहकांना दररोज प्रत्येकी एक हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. कॅशलेस म्हणजेच डिजीटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी ही योजना आहे.

14 एप्रिल म्हणजेच शेवटच्या दिवशी एक कोटी रुपयांचं मेगा अवॉर्ड जाहीर करण्यात येईल. विजेत्याला एक कोटी रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. द्वितीय क्रमांकाला 50 लाख, तर तृतीय विजेत्याला 25 लाख रुपये मिळतील.

डिजीटल धन व्यापारी योजनेअंतर्गत लकी व्यापाऱ्यांना आठवड्याला 50 हजार रुपयांपर्यंत बक्षीस जिंकण्याची संधी आहे. आठवड्याला सात हजार बक्षीसं जाहीर केली जातील.