दुबई : ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाने टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहलीचं आयसीसी क्रमवारीतलं अव्वल स्थान अबाधित राखलं आहे. आयसीसी क्रमवारीत नंबर वनवर असलेल्या टीम इंडियाच्या खात्यात आता सर्वाधिक 116 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका भारताने 2-1 अशी जिंकली होती. या विजयाचा फायदा भारतीय संघाला झाला आहे.
विराट कोहलीने 922 गुणांसह कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत सर्वोच्च स्थान राखलं आहे. इंग्लंडमध्ये कोहलीची बॅट चांगलीच तळपली होती. पण तो फॉर्म कोहलीला ऑस्ट्रेलियामध्ये राखता आला नाही. मात्र तरीही कोहलीने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखलं आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर असून, विल्यमसनपेक्षा विराटच्या खात्यात 25 गुण अधिक आहेत.
ऑस्ट्रेलियातल्या कसोटी मालिकेत सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या चेतेश्वर पुजाराने आयसीसी क्रमवारीत तिसरं स्थान मिळवलं आहे. यष्टीरक्षक रिषभर पंतने फलंदाजांच्या क्रमवारीत सतराव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर गोलंदाजांमध्ये भारताचा रवींद्र जडेजा पाचव्या आणि आर. अश्विन नवव्या स्थानावर आहे.