मँचेस्टर: वेस्टइंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटीत शानदार खेळी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं इतिहास रचला आहे. आयसीसीच्या नव्या रँकिंगमध्ये  स्टोक्स ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. आपल्या टेस्ट करिअरमध्ये त्याने पहिल्यांदाचं हे यश मिळवलं आहे. वेस्टइंडीजविरुद्ध सध्या सुरु कसोटी मालिकेत स्टोक्सने सर्वात जास्त धावा आणि सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.


अॅंड्रयू फ्लिंटॉफनंतर दुसरा इंग्लंडचा खेळाडू

वेस्टइंडीज सोबत सुरु असलेल्या मँचेस्टर कसोटीत बेन स्टोक्सने पहिल्या डावात 176 रन्स आणि एक विकेट, तर दुसऱ्या डावात नाबाद 78 धावा आणि दोन विकेट्स घेतल्या. या शानदार खेळीनंतर स्टोक्स आयसीसी टेस्ट ऑलराऊंडर रँकिंगमध्ये 497 गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. स्टोक्स हा अँड्रयू फ्लिंटॉफनंतर इंग्लंडचा दुसरा खेळाडू ठरला आहे ज्याने  टेस्ट ऑलराऊडर रँकिंगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे.

जेसन होल्डरचं नुकसान

कसोटी क्रिकेटमध्ये खूप दिवसांपासून वेस्टइंडिजचा कॅप्टन जेसन होल्डर नंबर वन ऑलराऊंडर होता. मात्र इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत खराब प्रदर्शनाचा फटका त्याला बसला आहे. तो आता 459 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्याला या मालिकेत साजेशी खेळी करता न आल्याचा फटका बसला आहे.

टॉप 5 मध्ये दोन भारतीय

आयसीसी टेस्ट ऑलराऊंडर रॅंकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर 397 गुणांसह रवींद्र जडेजा आहे तर 281 गुणांसह आर अश्विन पाचव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क 298 अंकांसह या यादीत चौथ्या स्थानी आहे.

इंग्लंडचा शानदार विजय 

कोरोनामुळं सगळीकडे खेळांवर परिणाम झाला आहे. या संकटात देखील इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान कसोटी मालिका सुरु आहे. प्रेक्षकांविना सुरु असलेल्या या मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने चार विकेट्सनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात स्टोक्सच्या शानदार खेळीच्या बळावर इंग्लंडने सामना 113 धावांनी जिंकला आहे. या विजयासह तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं 1-1 अशी बरोबरी साधली आहे. तिसरा सामना 24 जुलैपासून मँचेस्टरमध्येच खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी कोरोना बाबत सर्व प्रकारच्या नियमांचे पालन केले जात आहे.

संबंधित बातम्या

IPL 2020 | आयपीएलच्या 13 व्या सीजनचं दुबईत होणार आयोजन

कोरोनामुळे टी-20 वर्ल्ड कप यावर्षी होणार नाही, आयपीएलचा मार्ग मोकळा

England vs West Indies | चार महिन्यांनी क्रिकेटपटू मैदानात मात्र चिअर करण्यासाठी प्रेक्षक नाहीत!