ठाणे : ठाण्यात 18 दिवस केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाल्याचे चित्र आता दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात प्रत्येक दिवशी वाढणारा रुग्णांचा आकडा आता कमी कमी होताना दिसत आहे. ठाणे महापालिकेच्या 9 प्रभाग समितीच्या हद्दीत उच्चांक गाठणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांचा संख्येला दोन दिवसांपासून आहोटी लागलेली आहे. जुलै महिन्यात 400 पेक्षा जास्त रुग्ण दर दिवशी रुग्ण आढळून येत होते. मात्र आज मंगळवारी केवळ 187 रुग्ण सापडल्याने दिलासादायक चित्र आहे. तर मृत्यू झालेल्या रुग्णांचा संख्येतही घसरण झालेली असून मंगळवारी केवळ 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतार्यंतच्या मृतकांची एकूण संख्या 557 वर गेलेली आहे.


ठाणे महापालिकेच्या 9 प्रभाग समितीत एकूण 187 रुग्ण आज आढळले असून यात माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीत सर्वाधिक 46 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. वर्तकनगर प्रभाग समितीत 19 रुग्ण सापडले. लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समितीत मंगळवारी 13 रुग्ण सापडले. तर नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत मंगळवारी 21 रुग्ण सापडले आहेत. उथळसर प्रभाग समितीत 33 रुग्ण सापडले आहेत. वागळे प्रभाग समितीत एकूण 12 नवे रुग्ण सापडले आहेत. कळवा प्रभाग समितीत 25 नवे रुग्ण तर मुंब्रा प्रभाग समितीत केवळ 4 नवे रुग्ण सापडले असून दिवा प्रभाग समितीत 8 नव्या रुग्णांची नोंद मंगळवारी करण्यात आलेली आहे.


जून महिन्यात ठाण्यातील रुग्णसंख्येचा चढता आलेख बघायला मिळाला होता. देशभरात लॉकडाऊन असताना ठाण्यात 100 ते 150 नवीन रुग्ण आढळून येत होते. मात्र जून महिन्यात हा रोज सापडणाऱ्या नवीन रुग्णांचा आकडा वाढत गेला. सुरुवातीला नवीन रुग्णांची संख्या 200 मग 300 आणि जून महिन्याच्या शेवटी 400 पेक्षा जास्त वाढली. जुलै महिन्यात देखील 400 ते 450 रुग्ण रोज आढळून यायचे. मात्र त्यानंतर दोन जुलैपासून 19 जुलैपर्यंत पूर्णतः लॉकडाऊन ठाण्यात करण्यात आले. या दरम्यानच्या काळात कोविड 19 च्या रुग्णांची साखळी तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या आणि घरोघरी जाऊन तपासण्या करण्यात आल्या. त्याचाच फायदा गेले काही दिवस दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या कशी कमी झाली ते पाहूयात.


12 जुलै - 417 रुग्ण
13 जुलै - 333 रुग्ण
14 जुलै - 344 रुग्ण
15 जुलै - 400 रुग्ण
16 जुलै - 413 रुग्ण
17 जुलै - 342 रुग्ण
18 जुलै - 342 रुग्ण
19 जुलै - 297 रुग्ण
20 जुलै - 255 रुग्ण
21 जुलै - 187 रुग्ण


त्यामुळे या आकड्यांवरून हेच स्पष्ट होते की प्रशासनाने लॉकडाऊन केल्याने कोविड 19 च्या रुग्णांच्या संख्येत घट होण्यास मदत झाली आहे. मात्र आता लॉकडाऊन उठवली असल्याने पुन्हा एकदा तर सामाजिक सुरक्षेचे नियम पाळले नाहीत, तर ही रुग्णसंख्या वाढू शकते. त्यामुळे अजूनही सर्व नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे.


Web Exclusive | लॉकडाऊनची उपयुक्तता किती? | डॉ हरिष पाटणकर यांच्याशी बातचीत