मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलने (ICC) यावर्षी ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होणारा टी-20 वर्ल्ड कप रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता टी-20 वर्ल्ड कप पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आज झालेल्या आयसीसीच्या बोर्ड मीटिंगमध्ये वर्ल्ड कप टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


वर्ल्ड कप पुढे ढकलल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीजनचा रस्ता मोकळा झाला आहे. वर्ल्ड कप रद्द झाल्यामुळे बीसीसीआयकडून सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएलचं आयोजन केलं जाऊ शकतं.





गेल्या दोन महिन्यांपासून वर्ल्ड कपचं आयोजन यावर्षी होणार नाही, असे अंदाज बांधले जात होते. वर्ल्ड कपचं आयोजन करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने काही दिवसांपूर्वीच यावर्षी वर्ल्ड कपसाठी तयार नसल्याचं म्हटलं होतं. गेल्या काही दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियात कोरोनाचा व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. यामुळे सप्टेंबरच्या शेवटापर्यंत ऑस्ट्रेलियाने आपल्या सीमाही सील केल्या आहेत.


वर्ल्ड कप रद्द झाल्याने आयपीएल आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआयने आधीपासूनच सप्टेंबरमध्ये आयपीएलच्या आयोजनाची तयारी केली आहे. मात्र वर्ल्ड कपबाबत अधिकृत घोषणा न झाल्याने बीसीसीआयने आयपीएलचं नवं वेळापत्रक जारी केलं नव्हतं. मात्र सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नोव्हेंबरपर्यंत आयपीएलचं आयोजन केलं जाऊ शकतं असा अंदाज आहे. मात्र आयपीएलचं आयोजन कुठे होणार याबाबत कोणतीही स्पष्टता अद्याप नाही.