भारताचा अत्यंत अनुभवी टेबल टेनिसपटू शरथ कमल (Sharath Kamal) याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWG 2022) अप्रतिम कामगिरी करत तीन सुवर्णपदकांसह एक रौप्य पदक मिळवलं. मागील बरीच वर्षे शरथ टेबल टेनिस खेळात भारताकडून कमाल कामगिरी करत असल्याने यंदा त्याला देशातील सर्वात मानाच्या खेळ रत्न (Khel Ratna) पुरस्काराचं नामांकन मिळालं असून लवकरच त्याला हा पुरस्कार प्रदान केला जाईल. शरथने कॉमनवेल्थमध्ये भारतासाठी तीन सुवर्ण पदकं आणि एक रौप्य पदक जिंकलं. त्याने टेबल टेनिसमध्ये पुरुष संघ, मिश्र दुहेरी आणि पुरुष एकेरी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं तर पुरुष दुहेरी प्रकारात रौप्य पदक मिळवलं होत.
विशेष म्हणजे महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रानंतर हा सर्वात मोठा सन्मान मिळवणारा दुसरा टेबल टेनिसपटू शरथ असणार आहे. यंदा खेळरत्न पुरस्कारासाठी नामांकन झालेला शरथ एकमेव खेळाडू आहे, दरम्यान क्रीडा समितीने 2020 मध्ये 5 आणि 2021 मध्ये 11 नावांची शिफारस केली होती. यंदा मात्र एकमेव शरथचं नाव समोर आलं आहे. याशिवाय तसेच अर्जुन पुरस्कारासाठी 25 नावांची शिफारस करण्यात आली होती. त्यात बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, विश्वविजेता बॉक्सर निखत झरीन, अमित पंघल आणि CWG सुवर्णपदक जिंकणारा एल्डोस पॉल यांचा समावेश आहे. त्याशिवाय रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना आजीवन श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियाचे प्रशिक्षक सुजित मान, मोहम्मद अली कमर, तिरंदाजी प्रशिक्षक जीवनज्योतसिंग तेजा आणि रायफल प्रशिक्षक सुमा शिरूर (पॅरा नेमबाजी) यांची नियमित श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे.
अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केलेल्या भारतीय खेळाडूंची यादी
सीमा पुनिया (अॅथलेटिक्स), एल्डोस पॉल (अॅथलेटिक्स), अविनाश साबळे (अॅथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन), एचएस प्रणॉय (बॅडमिंटन), अमित पंघाल (बॉक्सिंग), निखत झरीन (बॉक्सिंग), भक्ती कुलकर्णी (बुद्धिबळ), आर प्रज्ञनंद (बुद्धिबळ), दीप ग्रेस एक्का (हॉकी), शुशीला देवी (ज्युडो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सैकिया (लॉन बोल्स), सागर ओव्हाळकर (मल्लखांब), इलावेनिल वालारिवन (नेमबाजी), ओम प्रकाश मिथरवाल (शूटिंग), श्रीजा अकुला (टेबल टेनिस), विकास ठाकूर (वेटलिफ्टिंग), अंशू मलिक (कुस्ती), सरिता मोर (कुस्ती), परवीन (वुशू), मनशी जोशी (पॅरा बॅडमिंटन), तरुण धिल्लॉन (पॅरा बॅडमिंटन), स्वप्नील पाटील (पॅरा स्विमिंग) , जर्लिन अनिका जे (पॅरा बॅडमिंटन)
द्रोणाचार्य पुरस्काराची नामांकन
रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना आजीवन श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियाचे प्रशिक्षक सुजित मान, मोहम्मद अली कमर, तिरंदाजी प्रशिक्षक जीवनज्योतसिंग तेजा आणि रायफल प्रशिक्षक सुमा शिरूर (पॅरा नेमबाजी) यांची नियमित श्रेणीतील द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे.