विशाखापट्टणम : सय्यद मुश्ताक अली टूर्नामेंटच्या दक्षिण विभागातील एक सामना अत्यंत रोमांचक झाला मात्र त्याला वादाचं गालबोट लागलं. कर्नाटक आणि हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात हैदराबादचा केवळ दोन धावांनी पराभव झाला, मात्र याच दोन धावांनी नव्या वादाला जन्म दिला.


या प्रकरणाची बीसीसीआयनेही दखल घेतली. कर्नाटकने या सामन्यात हैदराबादवर दोन धावांनी मात केली. सामना कर्नाटकने जिंकला असला तरी हा विजय संशयाच्या घेऱ्यात आहे. ज्यावर बीसीसीआयनेही ट्वीट करुन माहिती दिली आहे.


बीसीसीआयने कर्नाटक आणि हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्याची माहिती घेतली आहे. आता पंचांच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. ज्यानंतर बीसीसीआय आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करणार आहे.

नेमका वाद काय झाला?

कर्नाटकला प्रथम फलंदाजी करण्याचं निमंत्रण मिळालं. त्यानंतर कर्नाटकने करुण नायरच्या 77 आणि गौतम गंभीरच्या 57 धावांच्या खेळीच्या बळावर 20 षटकांमध्ये 5 बाद 205 पर्यंत मजल मारली.

दुसऱ्या डावात कर्नाटकचा खेळाडू मेहंदी हससने सीमा रेषेवर चेंडू अडवला. त्यावेळी पंचांनी रिप्लेमध्ये पाहण्याची तसदी घेतली नाही. मात्र हसनच्या पायाने सीमा रेषेला स्पर्ष केला होता. हैदराबादने अखेरच्या षटकापर्यंत पराभव स्वीकारला नाही, मात्र त्यांना 9 बाद 203 धावांपर्यंतच मजल मारता आली.

त्यानंतर हैदराबादचा कर्णधार अंबाती रायडू आणि संघाने आक्रमक पवित्रा घेत मैदानातच ठाणं मांडलं. त्यांनी सुपर ओव्हरची मागणी केली मात्र ती फेटाळत पंचांनी कर्नाटकचा दोन धावांनी विजय झाल्याचं जाहीर केलं. मात्र रायडू आणि त्याचे सहकारी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले.

याच मैदानावर आंध्र प्रदेश आणि केरळ यांच्यातलाही सामना खेळवण्यात येणार होता. मात्र या वादामुळे सामन्याला उशिर झाला. आंध्र प्रदेश आणि केरळचा सामना केवळ 13 षटकांचाच होऊ शकला, ज्यामध्ये आंध्र प्रदेशने केरळवर 6 विकेट्स राखून मात केली.