सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटी टीम इंडियाला 72 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता टीम इंडिया 13 जानेवारीपासून सुरु होत असलेल्या दुसऱ्या कसोटीसाठी कसून सराव करत आहे.


दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात काही बदल केले जातील, हे सराव सत्र पाहून स्पष्ट दिसत आहे. कर्णधार विराट कोहली नेहमीच नव्या बदलांसह खेळण्यासाठी उतरतो. त्यामुळे या कसोटीतही असंच काहीसं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

या सामन्यात सर्वात पहिली शक्यता सलामीवीर जोडीबाबत आहे. सलामीवीर केएल राहुलने मैदानात कसून सराव केला, ज्यावरुन अंदाज लावला जातोय की, राहुलचा दुसऱ्या कसोटीसाठी संघात समावेश केला जाईल.

शिखर धवनच्या ऐवजी राहुलचा समावेश केला जाऊ शकतो आणि सलामीला मुरली विजय आणि राहुल येण्याची शक्यता आहे. मुरली विजय फॉर्मात नसला तरीही त्याचा अनुभव जास्त आहे.

दुसरीकडे उपकर्णधार अजिंक्य रहाणेला सराव सत्रातही प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा बाहेर रहावं लागण्याची शक्यता आहे. रोहित शर्माला पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते.

पहिल्या कसोटीतील फलंदाजांच्या अपयशानंतर रहाणेचा अंतिम अकरामध्ये समावेश केला जाऊ शकतो, असा अंदाज लावला जात होता. असं झाल्यास एका वेगवान गोलंदाजाला बाहेर बसावं लागेल, हार्दिक पंड्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या भूमिकेत आहे.

सराव सत्रात रवींद्र जाडेजाने गोलंदाजी आणि फलंदाजीचा कसून सराव केला. ताप आल्यामुळे पहिल्या कसोटीला तो मुकला होता, ज्यामुळे आर. अश्विनला संधी देण्यात आली होती.