नवी दिल्ली : टीम इंडियाचा क्रिकेटर सुरेश रैना दोन वर्षांनंतर चेन्नई सुपर किंग्जमध्ये पुनरागमन करत आहे. आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी त्याला फ्रँचायझीने महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जाडेजासोबत रिटेन केलं आहे.
पहिल्या मोसमापासून धोनीकडे कर्णधारपदाची जबाबदारी होती आणि यावेळीही तोच असेल, हे जवळपास निश्चित आहे. मात्र सुरेश रैनाला त्याचा उत्तराधिकारी करण्याचा निर्णय संघव्यवस्थापनाने घेतला आहे.
यापूर्वीही सुरेश रैनाने धोनीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळलेली आहे. दोन वर्षांच्या बंदीनंतर सीएसके आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. 27 आणि 28 जानेवारी रोजी होणाऱ्या लिलावावर सर्वांची नजर असेल. जगभरातील दिग्गज खेळाडू कोणत्या संघाकडून खेळणार त्याचा निर्णय लिलावात होणार आहे.
''धोनी संघाचा कर्णधार, तर मी उपकर्णधार असेल आणि जाडेजा ऑलराऊंडरच्या भूमिकेत असेल. यानंतर आमची नजर आता लिलावावर असून चांगले खेळाडू घेण्याचा प्रयत्न राहिल. याबाबत लवकरच सर्वांची बैठक होईल'', असं रैना 'इंडिया टुडे'शी बोलताना म्हणाला होता.
रैना आणि धोनीकडे संभावित खेळाडूंची यादी पोहोचली आहे, ज्यांना संघात घेण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. फ्रँचायझी यावेळी भारताच्या चांगल्या खेळाडूंना घेण्यासाठी इच्छुक असतील.
''मी यादी पाहिली असून धोनीचीही त्यावर नजर आहे. भारताच्या चांगल्या खेळाडूंना खरेदी करण्यावर आमचा भर असेल. गेल्या दोन वर्षांपासून धोनी आणि मी वेगवेगळ्या संघांकडून खेळलो आहोत, अनेक खेळाडूंना पाहता आलं आहे, त्यामुळे त्यांना जोडण्याचा प्रयत्न असेल'', असं रैना म्हणाला.