हैदराबाद : गुजरात लायन्सला त्यांच्या आयपीएलमधील दुसऱ्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मोईसेस हेनरिक्स यांच्या अभेद्य भागीदारीच्या बळावर हैदराबादने हा सामना 9 विकेट्सने जिंकला.
गुजरातने हैदराबादला केवळ 136 धावांचं आव्हान दिलं होतं. डेव्हिड वॉर्नरने 6 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 45 चेंडूक 76 धावा ठोकल्या. तर त्याचा साधीदार हेनरिक्सने 52 धावांची अर्धशतकी खेळी करत विजयात महत्वाची भूमिका निभावली. सलामीवीर फलंदाज शिखर धवन 9 धावांवर बाद झाला.
गुजरातच्या गोलंदाजांप्रमाणे फलंदाजांनाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. सलामीवीर जेसन रॉय (31), दिनेश कार्तिक (30) आणि ड्वेन स्मिथ यांनाच मोठी खेळी करता आली.
हैदराबादचा गोलंदाज रशिद खान याने 3, तर भुवनेश्वर कुमारने 2 विकेट्स घेतल्या. आशिष नेहराने एका फलंदाजाला माघारी धाडलं.
कोलकाता नाईट रायडर्सकडून 10 विकेट्सने पराभव पत्करल्यानंतर गुजरातला या सामन्यातही पुनरागमन करता आलं नाही. गुजरातच्या गोलंदाजांना कोलकात्याच्या एकाही फलंदाजाला रोखता आलं नव्हतं.