हैदराबाद :  काही दिवसांपासून राम मंदिराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुप्रीम कोर्टानं राम मंदिर प्रश्नी दोन्ही पक्षांनी चर्चा करुन तोडगा काढावा अशा सुचना दिल्या होत्या. यानंतर काल केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही राम मंदिरासाठी वेळ पडलीच तर फासावरही जाईन, असं वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली होती. त्यातच आता एका भाजप आमदारानं वादग्रस्त वक्तव्य करुन या मुद्द्यावरुन वातावरण चांगलंच तापवलं आहे.


हैदराबादच्या गोशामलचे भाजप आमदार राजा सिंह यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यातून सर्व मर्यादाच पार केल्या आहेत. ते म्हणाले की, '' अयोध्येत राम मंदिर उभारलं, तर त्याचे गंभीर परिणाम भोगा असा इशारा देतात. आम्ही त्यांच्या याच इशाऱ्याची वाट पाहात आहोत. ज्यानंतर आम्ही त्यांचा शिरच्छेद करु.''


गेल्या 65 वर्षांपासून राम मंदिर आणि बाबरी मशिदचा वाद न्यायालयात सुरु आहे. 2010 मध्ये अलाहाबाद हायकोर्टानं हा वाद निकाली काढण्यासाठी वादग्रस्त भूमीची तीन भागात विभागणी केली. पण आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे.

सुप्रीम कोर्टाने यावर दोन्ही पक्षांनी एकत्रित बसून चर्चा करावी असे आदेश दिले होते. तसेच भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या दैनंदिन सुनावणीस नकार दिला होता.

यानंतर काल केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही, राम मंदिर हा आपल्या आस्थेचा, विश्वासाचा आणि अभिमानाचा विषय आहे. त्यासाठी तुरुंगात आणि वेळ पडलीच तर फासावरही जाईन, असं वक्तव्यं उमा भारती केलं होतं. त्यातच आता हैदराबादमधील भाजप आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हं आहेत.

संबंधित बातम्या

राम मंदिरासाठी तुरुंगात आणि फाशीवरही जाईन : उमा भारती

राम मंदिर खटला संवेदनशील, सहमतीने सोडवा : सुप्रीम कोर्ट

बाबरी मशीद प्रकरणावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी तहकूब

बाबरी प्रकरणी अडवाणींसह 13 नेत्यांच्या अडचणीत वाढ?