मुंबई : भारताचे माजी कसोटीवीर सुनील जोशी यांची बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मदनलाल, आरपी सिंग आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीनं पाच उमेदवारांमधून जोशी आणि हरविंदरसिंग यांचा निवड समितीत समावेश केला आहे. वेंकटेश प्रसाद, लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि राजेश चौहान यांना या निवड समितीत स्थान मिळू शकलं नाही. दरम्यान, बीसीसीआयच्या पाचसदस्यीय निवड समितीत देवांग गांधी, शरणदीपसिंग आणि जतीन परांजपे हे तिघं कायम राहतील. त्या तिघांची मुदत या वर्षअखेर संपणार आहे. सुनील जोशी आणि या नव्या निवडसमितीसमोर आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची निवड करण्याचे आव्हान असणार आहे.


आता सुनील जोशी हे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांची जागा घेतील. एसएसके प्रसाद यांचा कार्यकाळ मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात आला होता. मात्र मुख्य निवड समिती अध्यक्षांची नियुक्ती न झाल्याने एमएसके प्रसाद यांनीच न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघाची निवड केली होती. आता 12 मार्चपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी सुनील जोशी हे संघाची निवड करतील.


अजित आगरकरही होते शर्यतीत

बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी भारतीय संघाचे माजी खेळाडू वेगवान गोलंदाज अजित आगरकर देखील शर्यतीत होते. मात्र सीएसीने अजित आगरकर यांचं नाव शॉर्टलिस्ट केलेल्या पाच उमेदवारांच्या यादीतच घेतलं नाही. यामुळं अजित आगरकर बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडले.

बीसीसीआयच्या निवड समिती प्रमुख पदासाठी अजित आगरकर यांच्यासह व्यंकटेश प्रसाद, लक्ष्मण शिवरामकृष्णन यासारखे उमेदवार या पदाच्या शर्यतीत होते. मात्र मदनलाल, आर.पी. सिंह आणि सुलक्षणा नाईक यांच्या समितीने सुनिल जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

सुनील जोशी यांनी भारतीय संघासाठी 15 कसोटी आणि 69 एकदिवसीय सामने खेळले आहेत. जोशी यांनी कसोटीत 41 विकेट्स आणि एकदिवसीय सामन्यात 69 विकेट्स घेतल्या आहेत. तर हरविंदर सिंह यांनी भारतीय संघासाठी तीन कसोटी आणि 16 एकदिवसीय सामने खेळले आहेत.