नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील दोषी पवन कुमारची फाशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली आहे. यामुळे आता चारही दोषींच्या फाशीची तारीख म्हणजेच डेथ वॉरंट जारी होण्याचा मार्ग सुकर झाल्याचं चित्र आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, दया याचिका फेटाळल्यानंतर 14 दिवसांनंतर फाशी देण्याचं वॉरंट जारी होतं. याचा अर्थ स्पष्ट आहे की, 14 दिवसांनंतरच दोषींना फाशी मिळू शकते.


राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यानंतर निर्भयाच्या वकिलांनी आज (4 मार्च) पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल करुन दोषींचं नवं डेथ वॉरंट जारी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पवन अजूनही दया याचिका फेटाळण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करु शकतो.

केंद्रीय गृहमंत्रालयाला सोमवारी म्हणजेच 2 मार्च रोजी पवन गुप्ताची दया याचिका मिळाली होती. गृहमंत्रालयाने ही याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवली होती. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने सोमवारीच 2012 च्या या प्रकरणात चारही दोषींच्या फाशीवर पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली होती. आधी चारही दोषींना मंगळवारी  सकाळी सहा वाजता फासावर लटकवण्यात येणार होतं.

दिल्ली सरकारकडूनही याचिका फेटाळण्याची शिफारस
सोमवार को दिल्ली सरकारने निर्भया गँगरेप आणि हत्या प्रकरणात चार दोषींपैकी एक असलेल्या पवन गुप्ताने दाखल केलेली दया याचिका फेटाळण्याची शिफारस केली होती. गृहमंत्रालयाकडून ही याचिका राष्ट्रपतींकडे गेल्यानंतर दिल्ली सरकारने काही वेळातच ही शिफारस केली होती.

तीन डेथ वॉरंटला स्थगिती
यापूर्वी पटियाला हाऊस कोर्टाने 3 मार्चसाठी जारी केलेल्या तिसऱ्या डेथ वॉरंटला स्थगिती दिली होती. डेथ वारंट रद्द करताना कोर्टाने म्हटलं होतं की, फाशीच्या आधी कायद्याच्या सर्व पर्यायांचा वापर करण्याचा अधिकार दोषीला आहे. हे पाहणं कोर्टाचं काम आहे. त्यामुळे 3 मार्चपर्यंत निश्चित केलेली फाशी पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहे. याआधी 22 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला फाशीची तारीख निश्चित करण्यात आली होती.

काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?


- सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता.
- सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते.
- त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला.
- यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले.
- तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं.
- दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.


दरम्यान, पवन गुप्ता, मुकेश सिंह, अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा अशी या चार दोषींची नावं आहेत. तर या प्रकरणातील राम सिंह नावाच्या आरोपीने तिहार तुरुंगातच आत्महत्या केली होती. याशिवाय एक आरोपी अल्पवयीन असल्याने, ज्युवेनाईल कोर्टाने त्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली होती. 2015 रोजी त्याची सुटका झाली. त्यानंतर चारही दोषींनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने यांच्या पुनर्विचार याचिका फेटाळल्या होत्या.