मुंबई : भारताचे महान सलामीवीर सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाला पन्नास वर्षे झाल्यानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्यांचा 29 ऑक्टोबरला गौरव करण्यात येणार आहे. त्यानिमित्तानं गावस्कर यांना वानखेडे स्टेडियमवर कायमस्वरुपी कक्ष भेट देण्यात येणार आहे. त्याचवेळी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या नावानं वानखेडे स्टेडियमवर एका स्टँडचंही उद्घाटन करण्यात येणार आहे.


आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. एमसीए कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. टी-20 मुंबई लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर विशेष निमंत्रित म्हणून या बैठकीला उपस्थित होते. मुंबईनं भारतीय क्रिकेटला दिलेल्या दोन महान फलंदाजांच्या गौरवासासाठी राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीच्या दोन प्रमुख नेत्यांना एकत्र बोलावता येऊ शकतं या नार्वेकर यांनी मांडलेल्या प्रस्तावाला एकमतानं अनुमोदन मिळाल्याचं कळतं.


योगायोगाची बाब म्हणजे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांचंही मुंबई क्रिकेट आणि एमसीएशी जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळं मुंबई क्रिकेटच्या दोन अनमोल रत्नांच्या गौरवासाठी त्या दोघांनाही एकत्रित निमंत्रित करण्यात आलं आहे. पवार आणि मुख्यमंत्री यांच्यासह भारताचे माजी कर्णधार गुंडाप्पा विश्वनाथ आणि सचिन तेंडुलकरही हे दोघंही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं माजी अध्यक्ष माधव मंत्री यांच्या स्मरणार्थ क्रिकेट व्याख्यानाचीही परंपराही सुरु करण्यात येणार आहे. पहिलं व्याख्यान देण्याचा मान सुनील गावस्कर यांना देण्यात आला आहे.


सुनील गावस्कर यांनी 1971 सालच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनी 16 वर्षांच्या कारकीर्दीत 125 कसोटी सामन्यांमध्ये 34 शतकं आणि 45 अर्धशतकांसह 10,122 धावांचा, तर 108 वन डे सामन्यांमध्ये एक शतक आणि 27 अर्धशतकांसह 3092 धावांचा रतीब घातला होता. दिलीप वेंगसरकर यांनी 116 कसोटी सामन्यांमध्ये 17 शतकं आणि 35 अर्धशतकांसह 6868  धावा फटकावल्या आहेत. तसंच 129 वन डे सामन्यांमध्ये त्यांच्या नावावर एक शतक आणि 23 अर्धशतकांसह 3508  धावा आहेत. गावस्कर आणि वेंगसरकर या दोघांनीही कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्त्व केलं आहे.