भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने आणखी एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्या सक्रिय खेळाडूंच्या यादीत अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलर लिओनेल मेस्सीला मागे टाकत तो दुसर्या स्थानावर पोहोचला आहे. फिफा वर्ल्ड कप 2022 आणि आशियाई चषक 2022 च्या संयुक्त क्वालिफायर स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दोन गोल करून छेत्रीने हे यश संपादन केले. पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या दोन गोलच्या मदतीने ग्रुप-ईच्या दुसर्या फेरीच्या सामन्यात बांगलादेशचा 2-0 असा पराभव करून स्पर्धेतील पहिला विजय नोंदविला. या विजयामुळे भारतीय संघाच्या आशियाई क्वालिफायरच्या तिसऱ्या फेरीसाठी थेट पात्रतेच्या आशा वाढल्या आहेत. फिफा विश्वचषक पात्रता संघातील सहा वर्षांत हा संघाचा पहिला विजय आहे.
मेस्सीला टाकले मागे
सामन्याच्या उत्तरार्धात 36 वर्षीय सुनील छेत्रीने हे दोन्ही गोल केले. पहिल्या गेमच्या 79व्या मिनिटाला त्याने गोल करत संघाचे खाते उघडले. यासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्याच्या गोलांची संख्या वाढून 73 झाली आणि त्याने मेस्सीला (72 गोल) मागे टाकले आहे. खेळाच्या शेवटच्या क्षणी अतिरिक्त वेळेत दुसरा गोल केल्याने संघाचा विजय निश्चित झाला. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सक्रिय खेळाडूंमध्ये आता पोर्तुगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डो (103 गोल) नंतर सर्वाधिक गोल छेत्रीच्या (74 गोल) नावावर आहेत.
या कामगिरीबद्दल ऑल इंडिया फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुनील छेत्री यांचे अभिनंदन केले आणि ते म्हणाले की, "आमच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांच्या नावावर अजून एक कामगिरी नोंदली गेली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वाधिक सक्रिय खेळाडूंच्या यादीमध्ये त्यांनी अर्जेटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेलला मेस्सीला मागे टाकले आहे. या कर्तृत्वाबद्दल त्यांचे अभिनंदन. भविष्यात अशा आणखी विक्रमासाठी आमच्या शुभेच्छा. "
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल नोंदवणाऱ्या खेळाडूंच्या अष्टपैलू यादीमध्ये छेत्री 11 व्या स्थानावर पोहोचला आहे. दहाव्या क्रमांकावर त्याच्या पुढे तीन खेळाडू आहेत, ज्यात हंगेरीचा सेंडर कोक्सिस, जपानचा कुनिशिगे कामटो आणि कुवैतचा बशर अब्दुल्ला यांचा प्रत्येकी 75-75 गोल आहेत.