सचिनला वाढदिवसाची भेट नाहीच, मुंबईचा लाजिरवाणा पराभव
एबीपी माझा वेब टीम | 25 Apr 2018 08:21 AM (IST)
सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा अवघ्या 87 धावांत खुर्दा उडवून, आयपीएलच्या सामन्यात 31 धावांनी सनसनाटी विजय साजरा केला.
मुंबई : मुंबई इंडियन्सचा मेण्टॉर सचिन तेंडुलकरला काल त्याच्या वाढदिवशी विजयाची भेट मिळू शकली नाही. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा अवघ्या 87 धावांत खुर्दा उडवून, आयपीएलच्या सामन्यात 31 धावांनी सनसनाटी विजय साजरा केला. वानखेडे स्टेडियममधल्या या सामन्यावर उभय संघांच्या गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मुंबईने आधी या सामन्यात हैदराबादचा डाव केवळ 118 धावांत गुंडाळला होता. मग हैदराबादच्या प्रभावी आक्रमणासमोर मुंबईचा अख्खा डाव 87 धावांत गडगडला. हैदराबादच्या सिद्धार्थ कौलने तीन, तर राशिद खान आणि बेसिल थम्पीने प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. मुंबईच्या सूर्यकुमार यादवने 34 आणि हार्दिक पंड्याने 24 धावांची खेळी उभारली. पण त्यांच्या इतर नऊ फलंदाजांना मिळून 27 धावाच जमवता आल्या. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला सहा चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यातला हा पाचवा पराभव ठरला. दोन गुणांसह मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. गुणतालिकेत 10 गुणांसह किंग्ज इलेव्हन पंजाब अव्वल स्थानावर कायम आहे. तर त्याखालोखाल चेन्नई सुपर किंग्ज (8) दुसऱ्या आणि सनरायझर्स हैदराबाद (8) तिसऱ्या स्थानावर आहे.