जोधपूर : अल्पवयीन मुलीवरील बलात्काराप्रकरणात दोषी ठरलेला आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जोधपूर SC आणि ST कोर्टाने ही शिक्षा ठोठावली. याप्रकरणातील दुसरे आरोपी शरद आणि शिल्पी यांना 20-20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
आसाराम गेल्या 1 हजार 667 दिवस जोधपूर सेंट्रल जेलमध्ये आहे.
जोधपूर कोर्टाने आज सकाळीच आसारामसह शरद आणि शिल्पी या तिघांना दोषी ठरवलं. तर प्रकाश आणि शिवा या दोन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं. एकूण पाच आरोपींबाबत कोर्टाने आज निर्णय दिला.
6 नोव्हेंबर 2013 रोजी पोलिसांनी आसाराम आणि त्याचे सहकारी शिवा, शिल्पी, शरद आणि प्रकाश यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.
आसारामविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत, जुवेनाईल जस्टिस्ट अर्थात अल्पवयीन न्याय आणि आयपीसीच्या अन्य कलमांअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मरेपर्यंत जन्मठेप
जोधपूर कोर्टाने आसारामला पॉक्सोसह अन्य तीन कलमांतर्गत दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जन्मठेप म्हणजेच जिवंत असेपर्यंत जेलमध्येच राहावं लागेल. त्यामुळे आसाराम बापूचे जेलमधून सुटण्याचं स्वप्न भंगलं आहे.
आसाराम रडला
कोर्टाने निकाल सुनावल्यानंतर आसाराम कोर्टातच रडला. हरी ओम हरी ओम मंत्राचा जप करत होता. शिक्षा सुनावताच आसाराम डोकं धरुन खाली बसला आणि धाय मोकलून रडू लागला.
न्यायाधीश निकालाचं वाचन करत होते, तेव्हा आसाराम सहआरोपी शरद आणि शिल्पी यांच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता.
कडेकोट सुरक्षा
हा निकाल येण्याआधीच दिल्लीपासून जोधपूरपर्यंत सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जोधपूरला तर छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे.
राम रहीमचा निकाल आल्यानंतर ज्याप्रकारे त्याच्या अनुयायांनी दिल्लीसह अनेक ठिकाणी हैदोस घातला, तशीच परिस्थिती यावेळीही होण्याची शंका पोलिसांना आहे. आसाराम दोषी ठरल्यास त्याचे समर्थक गोंधळ घालू शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती.
मुलीच्या आरोपानुसार, "15 आणि 16 ऑगस्ट 2013 च्या रात्री जोधपूरच्या एक फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने उपचाराच्या बहाण्याने लैंगिक शोषण केलं होतं." दिल्लीच्या कमलानगर पोलिस स्टेशनमध्ये 19 ऑगस्ट 2013 रोजी आसारामविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.
2013 पासून आसाराम जेलमध्ये!
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमधील एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. जोधपूरबाहेर असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला होता. त्यावेळी मुलगी आश्रमात राहत होती आणि ती 16 वर्षांची होती.
दिल्लीच्या कमलानगर मार्केट पोलिस स्टेशनमध्ये आसारामविरुद्ध शून्य नंबरचा गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर तो जोधपूरमध्ये ट्रान्सफर करण्यात आला.
आसाराम बापूवर भारतीय दंडविधान कलम 342, 376, 354-अ, 506, 509/34, जेजे अॅक्ट 23 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूला इंदूरमधून 31 ऑगस्ट 2013 रोजी अटक केली होती. तेव्हापासून आसाराम बापू जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद आहे.
कसा चालला खटला?
जोधपूर सत्र न्यायालयात आसारामविरुद्धचा खटला सुरु होता. कोर्टाने आरोप निश्चित केले. आरोपपत्रात 58 साक्षीदार सादर करण्यात आले. तर सरकारी वकिलांनी 44 साक्षीदारांनी जबाब नोंदवला. 11 एप्रिल 2014 पासून 21 एप्रिल 2014 दरम्यान पीडित मुलीचा 12 पानांचा जबाब नोंदवला. 4 ऑक्टोबर 2016 रोजी आरोपी आसारामचा जबाब नोंदवण्यात आला.
22 नोव्हेंबर 2016 पासून 11 ऑक्टोबर 2017 पर्यंत बचाव पक्षाने 31 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सोबतच 225 दस्तऐवज जारी केले. एससी-एसटी कोर्टात 7 एप्रिलला युक्तिवाद पूर्ण झाला आणि कोर्टाने निकाल सुनावण्यासाठी 25 एप्रिलची तारीख निश्चित केली.
..तरीही बापूची सुटका होणार नाही
जर या प्रकरणात न्यायालयाने आसाराम बापूला निर्दोष ठरवलं असतं, तरी तो तुरुंगातून सुटला नसता. कारण त्याच्याविरोधात गुजरातमध्येही बलात्काराचा खटला सुरु आहे.
जोधपूरचे पोलिस आयुक्त अशोक राठोड यांनी सांगितलं की, "निकालाच्या दिवशी बापूचे हजारो अनुयायी जोधपूरमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी लावण्यात आली आहे."
दिल्लीपासून राजस्थानपर्यंत अलर्ट
निकालानंतर दिल्लीपासून राजस्थानपर्यंत कोणतीही आणीबाणीची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी दोन्ही राज्यांच्या सरकारने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दिल्ली पोलिस पूर्णत: अलर्ट आहे. तर जोधपूरमध्येही कलम 144 लावण्यात आलं आहे.
कुठेही लोकांचा जमाव दिसला की कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दिल्ली पोलिसातील अधिकारी उत्तर प्रदेश आणि हरियाणा पोलिसांशी संपर्कात आहेत. पोलिसांनी लोकल इंटेलिजन्सद्वारे आसारामचे आश्रम आणि त्याच्या समर्थकांच्या हालचालींवर नजर ठेवल्याचा दावा केला आहे.
आश्रमांमध्ये अनुयायांकडून पूजा-कीर्तन सुरु
दिल्ली-एनसीआरमधील आसाराम बापूच्या आश्रमांमध्ये त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा होत आहेत. यामध्ये महिला, वयोवद्ध आणि मुलांचाही समावेश आहे. बापूंना न्यायालयाकडून न्याय मिळेल, असं समर्थकांचं म्हणणं आहे. यासाठी ते प्रार्थनेसाठी जमा झाले आहेत. आश्रमांमध्ये कीर्तन आणि पूजा केली जात आहे.
संबंधित बातम्या
आसाराम बापूविरोधातील बलात्कार प्रकरणाचा तपास संथ गतीने, सुप्रीम कोर्टाने फटकारलं
आसाराम बापूच्या भक्तांचे एकमेकांवर जीवघेणे हल्ले?
आसाराम बापू 19 ऑक्टो. पर्यंत सुरत पोलीसांच्या कोठडीमध्ये...
आसाराम बापू महिलांना रात्री भेटत असत - शिवा