Shaheen Shah Afridi : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव झाला. कर्णधार मोहम्मद रिझवानने 62 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 74 धावांची खेळी केली, तर शाहीन आफ्रिदीने 22 धावांत 3 विकेट घेतल्या, पण तो आपल्या संघाचा पराभव वाचवू शकला नाही. मात्र, असे असूनही शाहीन आफ्रिदी खूश असेल. तो केवळ एका विक्रमाच्या बाबतीत पाकिस्तानचा पहिला गोलंदाज ठरला नाही, तर क्रिकेटच्या इतिहासात कोणताही भारतीय गोलंदाज करू शकला नाही, अशी कामगिरी त्याने केली आहे.
क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये 100 बळी घेणारा गोलंदाज
शाहिद आफ्रिदीचा जावई शाहीन आफ्रिदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये 100 बळी घेणारा पाकिस्तानचा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने सामन्यात तिसरी विकेट घेत इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शाहीनने पॉवरप्लेमध्ये एक, मधल्या ओव्हर्समध्ये एक आणि मॅचच्या स्लॉग ओव्हर्समध्ये एक विकेट घेतली. अशा प्रकारे त्याने तीन विकेट घेत ही दुर्मिळ कामगिरी केली.
शाहीन आफ्रिदी पाकिस्तानचा पहिला गोलंदाज
T20 आंतरराष्ट्रीय व्यतिरिक्त, 24 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 112 आणि कसोटी क्रिकेटमध्ये 116 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या रेकॉर्डब्रेक स्पेलसह, तो हारिस रौफ आणि शादाब खान यांच्यानंतर 100 T20 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा तिसरा पाकिस्तानी गोलंदाज बनला. शाहीनने पाकिस्तानसाठी 74 व्या सामन्यात हा आकडा स्पर्श केला. एवढेच नाही तर पाकिस्तानसाठी सर्वात वेगवान 100 बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. याआधी गोलंदाज हरिस रौफने 71 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती.
बुमराह-भुवनेश्वर कुमार जे करू शकले नाहीत तो पराक्रम
शाहीन ही कामगिरी करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आणि न्यूझीलंडचा टीम साऊदी, बांगलादेशचा शकिब अल हसन आणि श्रीलंकेचा लसिथ मलिंगा यांच्या पंक्तीत सामील झाला. दुसरीकडे, भारताच्या एकाही गोलंदाजाला हा विक्रम करता आलेला नाही. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहच्या नावावर 89 आणि भुवनेश्वर कुमारच्या नावावर 90 विकेट्स आहेत, तर युजवेंद्र चहल 96 विकेट्ससह सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. चहलने कसोटी खेळलेली नाही, बुमराहच्या नावावर एकदिवसीय आणि कसोटीत 100 पेक्षा जास्त विकेट आहेत, मात्र भुवीच्या नावावर फक्त एकदिवसीय सामन्यात 100 पेक्षा जास्त विकेट आहेत. कसोटीत त्याच्या नावावर फक्त 63 विकेट्स आहेत.
दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव केला
शाहीनच्या चमकदार कामगिरीनंतरही पाकिस्तानला 11 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. 184 धावांच्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधार मोहम्मद रिझवानला दुसऱ्या टोकाकडून कोणतीही साथ मिळाली नाही. त्याच्या 74 धावांव्यतिरिक्त केवळ सॅम अयुब (31) आणि तय्यब ताहिर (18) दुहेरी धावा करू शकले.
इतर महत्वाच्या बातम्या