लंडन:  इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सामन्याच्या 15 टक्के दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे हा दंड स्टुअर्ट ब्रॉडला ठोठावला आहे तो त्याच्या वडिलांनी. इंग्लंड व पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानी स्पिनर यासिर शाह विरोधात अनुचित भाषा वापरणाऱ्या इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड सामन्याचे रेफरी आणि स्टुअर्ट ब्रॉडचे वडील असलेल्या ख्रिस ब्रॉड यांनी ठोठावल्याने याची विशेष चर्चा आहे. या सामन्यात ख्रिस ब्रॉड रेफरी होते, त्यामुळे त्यांनी आयसीसीच्या नियमांतर्गत दंड ठोठावला.


कसोटी सामन्यात  स्टुअर्ट ब्रॉडने यासिर शाहला आउट केल्यानंतर अनुचित भाषा वापरली. यानंतर त्याला आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने दंड ठोठावला. सोबत त्याला एक डिमेरिट अंक देण्यात आला आहे. मागील 24 महिन्यातील त्याने तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केले आहे.


क्रिकेटच्या इतिहासात असेल कदाचित पहिल्यांदाच घडले असावे, जेव्हा रेफरी वडिलांनीच मुलाला शिक्षा दिली आहे. ब्रॉडने देखील आपली चूक मान्य केली आहे. आयसीसीने याबाबत माहिती दिली आहे. त्यावर  ब्रॉडने देखील मजेशीर ट्वीट केले आहे. त्यांना ख्रिसमसला देण्यात येणाऱ्या गिफ्ट आणि कार्ड्सच्या यादीतून बाहेर ठेवण्यात आले आहे.

ख्रिस ब्रॉड यांनी इंग्लंडकडून 25 कसोटी सामने खेळले आहेत.