सिडनी : बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळलेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना त्यांच्या क्लबने ग्रेड क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू लवकरच मैदानात दिसणार आहेत.


स्मिथ आणि वॉर्नरवर दक्षिण आफ्रिकेत झालेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी बंदी घालण्यात आली होती.

दरम्यान, स्मिथच्या सदरलँड आणि वॉर्नरच्या रँडविक पीटरशेम संघाने याअगोदरच आपापल्या खेळाडूंना पाठिंबा दिलेला आहे. स्मिथ आणि वॉर्नर यांना ग्रेड क्रिकेट खेळण्यासाठी परवानगी मिळाली आहे. तर बॉल टॅम्परिंग प्रकरणातला तिसरा खेळाडू कॅमेरुन बॅनक्राफ्टबाबत अद्याप निर्णय बाकी आहे, अशी माहिती आयसीसीने दिली.

क्रिकेट डॉट कॉम एयूच्या वृत्तानुसार, बॅनक्राफ्टबाबत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रमुख क्लब सोमवारी एका बैठकीत निर्णय घेतील.

वॉर्नर आणि स्मिथ यांना आपापल्या क्लबकडून खेळण्यासाठी काहीही हरकत नसल्याचं न्यू साऊथ वेल्स क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केलं.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून बॉल टॅम्परिंग करण्यात आली होती. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथ आणि वॉर्नरवर एक-एक वर्षाची आणि बॅनक्राफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातली. संघाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनीही मालिका संपल्यानंतर राजीनामा दिला होता.