अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड काटेवाडी दुहेरी हत्याकांड प्रकरणी दहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला.


2014 साली आसाराम बहिर आणि नितीन या बापलेकांची शेतीच्या वादातून हत्या झाली होती. काठ्या, गज आणि लाकडी दांडक्याने हत्या करण्यात आली होती.

या हत्याकांडात महादेव बहिर याने चुलता आणि चुलत भावाची निर्घृण हत्या केली होती. आरोपींमध्ये मयत आसारामचे चुलतभाऊ आणि पुतणे आणि तीन बाप-लेकांचा समावेश आहे. आसारामचे हे सख्खे चुलत भाऊ आहेत.

काय आहे प्रकरण?

आसाराम आणि पुतण्या महादेव यांच्यात पावणे आठ एकराचा वाद होता. जामखेड न्यायालयाने असाराम यांच्या बाजूने वहिवाट करण्याचा निर्णय दिला. मात्र यानंतरही 2014 साली बाप-लेकांची निर्घृण हत्या करण्यात आली. यावेळी नितीनच्या आईलाही जमावाने बेदम मारहाण केली होती.

नितीन याला नुकतीच नोकरी मिळाली होती. घटनेनंतर सात दिवसांनी त्याचं लग्न होतं. या लग्नासाठी तो इगतपुरीवरुन आला होता. मात्र यापूर्वीच बाप-लेकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.