पर्थ : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथची शानदार कामगिरी सुरुच आहे. प्रतिष्ठित अॅशेज सीरिजच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शतक ठोकून त्याने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे.


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने कसोटी कारकिर्दीतील 22वं शतक ठोकलं. 22वं शतक वेगवान पूर्ण करणारा स्टीव्ह स्मिथ हा तिसरा फलंदाजआहे.

इंग्लंडविरुद्ध पर्थमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शतक पूर्ण करताच त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला मागे टाकलं.

28 वर्षीय स्टीव स्मिथने 108 व्या डावात 22वं कसोटी शतक ठोकलं. सचिनने हा पराक्रम 114 डावात केला होता. महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी केवळ 58 डावांमध्ये 22 शतकं पूर्ण केली होती. तर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी 101 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने सलग चार वर्षांत एक हजार धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडननंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा क्रिकेटर आहे. हेडनने 2001-05 पर्यंत सलग पाच वर्ष एक हजार धावा केल्या होत्या.

इंग्लंडविरुद्धच्या पर्थ कसोटीत स्टीव स्मिथने 138 चेंडूत शतक पूर्ण केलं. कर्णधार स्मिथच्या कसोटी कारकिर्दीतलं हे सर्वात जलद शतक आहे.

ऑस्ट्रेलियन संघाने अॅशेज सीरिजमधली आघाडी कायम ठेवली आहे. स्टीव स्मिथच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना 10 विकेट्सनी जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात 120 धावांनी शानदार विजयाची नोंद केली होती.