आयपीएलचे सर्व मीडिया हक्क स्टार इंडियाकडे, तब्बल 16 हजार 347 कोटींची बोली
एबीपी माझा वेब टीम | 04 Sep 2017 02:05 PM (IST)
स्टार इंडियाने आयपीएल प्रक्षेपणाचा मीडिया हक्काचा लिलाव जिंकला आहे. प्रक्षेपण हक्कासाठी स्टार इंडियाने सर्वाधिक 16 हजार 347.50 कोटींची बोली लावली.
मुंबई: स्टार इंडियाने आयपीएल प्रक्षेपणाचा मीडिया हक्काचा लिलाव जिंकला आहे. प्रक्षेपण हक्कासाठी स्टार इंडियाने सर्वाधिक 16 हजार 347.50 कोटींची बोली लावली. या विक्रमी बोलीमुळे स्टार इंडियाला आयपीएल प्रक्षेपणाचे हक्क मिळाले आहेत. 2018 ते 2022 या पाच वर्षांसाठी स्टार इंडियाकडे हे हक्क राहतील. या लिलावासाठी 24 कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. मात्र त्यापैकी 14 कंपन्यां प्रत्यक्ष आर्थिक बोलीसाठी सज्ज होत्या. पण पात्रता फेरीत त्यापैकी एक कंपनी आऊट झाली. उरलेल्या 13 कंपन्यांनी आयपीएलचे हक्क आपल्याला मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न केले, पण स्टार इंडियाने या सर्वांवर मात केली. या लिलावात सोनी, बी स्पोर्ट्स, सुपरस्पोर्ट, फॉलो ऑन, Yupp TV, टाईम्स इंटरनेट, फेसबुक, एअरटेल, BAM Tech, इको नेट, परफॉर्म ग्रुप, रिलायन्स जिओ अशा मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. डिजीटल हक्कांसाठी अमेझॉन, ट्विटर, डिस्कव्हरी, फेसबुक, एअरटेल यासारख्या दिग्गज कंपन्यांनी प्रयत्न केले. मात्र टीव्ही, डिजिटल संपूर्ण भारत आणि जगभरातील सर्व मीडिया हक्क मिळवण्यात स्टार इंडिया यशस्वी झाली.